नक्षलवादी कारवाया थांबल्याचे कारण पुढे करीत किनवट तालुक्यास नक्षलग्रस्त भागातून वगळण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने स्थगिती दिली. आमदार प्रदीप नाईक यांच्या पुढाकारातून ही स्थगिती मिळाल्याने आता किनवट पुन्हा नक्षलग्रस्त भागांच्या यादीत असणार आहे.
काही वर्षांपूर्वी किनवट व माहूर तालुक्यांत नक्षलवादी कारवाया मोठय़ा प्रमाणावर होत्या. याच कारवायांमुळे राज्याच्या गृहदफ्तरी जिल्ह्य़ाची ओळख नक्षलवाद्यांचा जिल्हा अशी झाली होती. वाढत्या नक्षलवादी कारवायांच्या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने किनवटचा समावेश नक्षलग्रस्त तालुक्यांच्या यादीत केला. परिणामी, या भागाच्या विकासास मोठय़ा प्रमाणात निधी मिळत होता. शिवाय तालुक्यात काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना विशेष भत्ताही मिळत होता. सध्या नक्षलवादी कारवाया नसल्या, तरी अनेक नक्षलवादी येथे आश्रयास असतात. नक्षलवाद्यांकडून थेट कारवाया नसल्याने तालुक्यातील नक्षलवादी कारवाया थांबल्याचे कारण पुढे करीत सरकारने किनवट तालुका नक्षलग्रस्त तालुक्यांच्या यादीतून वगळण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने सामान्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्यानंतर आमदार नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांची भेट घेऊन जनतेच्या भावना कानी घातल्या. आमदार नाईक यांनी केलेली आग्रही मागणी व पाठपुराव्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे पोलिसांचे नक्षलविरोधी कृती दल (सी ४७) नांदेडला हलविण्यात येणार होते, पण आता त्याचे स्थलांतरही थांबले आहे. नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे ही स्थगिती मिळाल्यानंतर तालुक्यातील जनतेने आनंद व्यक्त केला. स्थगिती आदेशामुळे विकासासाठी घसघशीत निधी येण्याची प्रक्रिया सुरूच राहील. आमदार नाईक यांचे जनतेने अभिनंदन केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया जि. प.चे उपाध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांनी व्यक्त केली.