पूरग्रस्त शिये व इतर गावचे पुनर्वसन करावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी येथील पंचगंगा नदीत उड्या मारल्या. अग्निशमन दल व पोलिसांनी त्यांना नदी पात्रातून बाहेर काढले. त्यांना ताब्यात घेतले असून करवीर पोलीस ठाण्यांमध्ये आणले आहे.

कोल्हापूर शहरापासून जवळ शिये गाव आहे. दरवर्षी पंचगंगेच्या पुराचा यासह अन्य गावाला फटका बसतो. महापुरात या गावातील लोकांचे स्थलांतर करावे लागते. यामुळे शियेचे पुनर्वसन करावे, या मागणीसाठी जिल्हा प्रशासनाकडे अनेक निवेदने द्देवून आंदोलनेही केली आहेत. मात्र दुर्लक्ष होत असल्याने रघुनाथदादा पाटील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरातील शिवाजी पुलावरून पंचगंगा नदीमध्ये उडी मारण्याचा इशारा दिला होता. मात्र अशा पद्धतीचे आंदोलन करू नये अशा सूचना पोलिसांना आंदोलकांना दिली होती.

त्याकडे दुर्लक्ष संघटनेचे कार्यकर्ते, ग्रामस्थ दुपारी साडेचार वाजता पंचगंगा नदीकाठी आले. ते नदी काठावरून ‘पुनर्वसन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, पुनर्वसन नाही तर घरात बुडावे का? असे फलक घेऊन चालले होते अचानक या कार्यकर्त्यांनी नदीच्या पात्रामध्ये उड्या मारल्या. आणि पुनर्वसनाच्या मागणीसाठी घोषणाबाजीही सुरू केली. त्यावर शासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली. अग्निशमन दल व पोलिसांनी नदीत उड्या मारून आंदोलकांना पात्राबाहेर काढले. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वकील माणिक शिंदे, शिये गावचे अध्यक्ष उत्तम शंकर पाटील,बाबासाहेब गोसावी, देवदास लाडगावकर यांच्यासह सुमारे पंधरा कार्यकर्त्यांना पोलिसांनी करवीर पोलिस ठाण्यामध्ये आणले आहे.