कोल्हापूर जिल्हा सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे त्रस्त आहे. रुग्ण संख्या आणि मृत्यूदरही वाढत असल्याने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय पथक कोल्हापुरात आज दाखल झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात या पथकाची स्थानिक अधिकाऱ्यांसमवेत बैठक सुरू आहे. नवे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केंद्रीय पथकासोबत होणारी ही पहिलीच बैठक आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील करोना रुग्णसंख्या पावणे दोन लाखांवर गेली आहे तर दीड लाखाहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्ण संख्या मे महिन्यामध्ये वाढत केली. जून महिन्यात ही संख्या दुप्पट झाली. जुलैमध्ये तुलनेने रुग्ण कमी असले तरी संसर्गाचा धोका कायम आहे. सध्या सरासरी दीड हजार रुग्ण नव्याने दाखल होत आहेत.

हेही वाचा -“राज्यात करोनाच्या नियमांमध्ये कोणतीही सूट नाही” आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार , आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बैठक घेऊन सूचना केल्या होत्या.पण त्यानंतरही परिस्थिती फारशी आटोक्यात आलेली नाही. यासाठी आता केंद्रीय पथक कोल्हापुरात दाखल झाले आहे

केंद्रीय गृह व नगर विकास विभागाचे सहसचिव कुणाल कुमार यांच्या नेतृत्वाखाली तीन अधिकाऱ्यांचे पथक आले आहे. जिल्हाधिकारी, महापालिकेचे प्रशासक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या समवेत पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेतली आहे.

त्यामध्ये करोना नियंत्रणात आणण्यासाठी आजवर केलेल्या उपाययोजना आणि संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी केलेलं नियोजन याचा आढावा घेतला आहे. काही रुग्णालये व संसर्ग वाढत असलेल्या भागांनाही भेट दिली जाण्याची शक्यता आहे.