जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्था आणि खासगी रुग्णालयांनी कुंभमेळ्यात आरोग्य सुविधेसाठी प्रशासनास सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. शनिवारी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या संदर्भात चर्चा करण्यात आली. आगामी सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर, आरोग्य सुविधांचे नियोजन करताना जिल्ह्य़ातील आरोग्य संस्था, रुग्णालये, सेवाभावी संस्था, वैद्यकीय महाविद्यालय यांच्यासोबत समन्वय ठेवण्याच्या दृष्टिकोनातून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आ. डॉ. राहुल आहेर, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, आरोग्य उपसंचालक डॉ. बी. डी. पवार आदी उपस्थित होते. विविध आरोग्य सुविधांबाबत सहकार्य करण्यासाठी विविध संस्था आणि रुग्णालये पुढे येत असल्याने कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याची योग्य काळजी घेतली जाईल, असा विश्वास डवले यांनी व्यक्त केला. या सर्व संस्था आणि शासकीय यंत्रणेत समन्वय साधण्यासाठी समिती गठित करण्याची सूचना करण्यात आली. आ. डॉ. आहेर यांनी रुग्णवाहिका चालकांना प्रशिक्षण देण्याबरोबर मोबाइल अ‍ॅप्सवर रुग्णवाहिकेचे मार्ग दर्शविण्याची सूचना केली. आरोग्य विद्यापीठातर्फे डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांना तीन स्तरांवर एप्रिलपासून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. डॉ. गेडाम यांनी आरोग्य सुविधांसाठी महापालिकेने केलेल्या नियोजनाची माहिती दिली. कुंभमेळा कालावधीत २४ तास वैद्यकीय सुविधा देण्यासाठी आवश्यक यंत्रणा राबविण्यासाठी तीन नियंत्रण पथके तयार करण्यात आली आहेत. आरोग्य सुविधांच्या मोबाइल अ‍ॅपसाठी रुग्णालयांनी संपर्क क्रमांक, इतर आवश्यक माहिती समन्वयक अधिकाऱ्यांकडे द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. आरोग्य व्यवस्थेचे नियोजन करताना प्रत्येक मार्गावर रुग्णवाहिकांची सुविधा, संदर्भित करावयाच्या रुग्णालयांचा कृती आराखडा, तात्काळ वैद्यकीय सुविधा पुरविण्याबाबतचे नियोजन आदी मुद्दय़ांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.