महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात शिवराज्य पक्षाच्या वतीने लवकरच महिला दक्षता समित्यांची स्थापना करण्यात येईल, अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दिली. येथील कालिदास कलामंदिर येथे आयोजित शिवराज्य पक्षाच्या विभागीय मेळाव्यात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य बाबा खान होते. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे जनता महागाईने होरपळत असून सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे कोणत्याही राजकीय पक्षाचे लक्ष नाही. शिवराज्य पक्षातर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर संघटन सुरू असून यापुढे पक्ष जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमकपणे रस्त्यावर उतरणार असल्याचे सावंत यांनी नमूद केले. या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांना पक्षाचे ध्येयधोरण व उपक्रमांबद्दल माहिती देत घटनेचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन केले. मेळाव्यात पक्षाचे प्रदेश सचिव रवींद्र जाचक यांनी विधानसभेच्या सर्व जागा पक्ष लढविणार असल्याचे सांगितले. पक्षाचे उपाध्यक्ष संजीव भोर यांनी महाराष्ट्रात शिवराज्य निर्माण करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी अंजना महाले, प्रशिक्षक गणेश हलकारे व राज्य समन्वयक संदीप सावंत यांनीही मार्गदर्शन केले. काही पदाधिकाऱ्यांना या वेळी नियुक्तिपत्र देण्यात आले. पक्षाचे विभागीय अध्यक्ष प्रा. संजय जाधव यांनी प्रास्तविक केले. अतुल पवार यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा कार्याध्यक्ष संजय माळोदे यांनी आभार मानले.