दंगा नियंत्रण पथक आणि राज्य राखीव पोलीस दल असा प्रचंड फौजफाटा आणून आणि मोजणीस विरोध करणाऱ्या दोन ते तीन शेतकऱ्यांना मध्यरात्रीच ताब्यात घेऊन सोमवारी जिल्हा प्रशासनाने इंडिया बुल्स कंपनीसाठी प्रस्तावित रेल्वे मार्गासाठीच्या जमिनींच्या संयुक्त मोजणीच्या कामास सुरूवात केली. प्रशासन दबावतंत्राचा वापर करून हे काम पुढे रेटत असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला असून दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने मात्र नियमानुसार ही प्रक्रिया होत असल्याचा दावा केला आहे.
इंडिया बुल्स रिअलटेक कंपनीतर्फे सिन्नर येथे महाकाय औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी लागणारा कोळसा प्रकल्प स्थळापर्यंत नेण्याकरिता एकलहरे ते सिन्नर असा रेल्वेमार्ग प्रस्थावित करण्यात आला आहे. या रेल्वे मार्गासाठी जमीन देण्यास काही शेतकऱ्यांचा विरोध आहे. या विरोधामुळे दोन वर्षांपासून प्रलंबित राहिलेली ही प्रक्रिया पूर्णत्वास नेण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी चालविली होती. या प्रकल्पातील दहा पैकी सात गावांची संयुक्त मोजणी आधीच पूर्ण झाली असून नायगाव, बारागावपिंप्री आणि एकलहरा या गावांची मोजणी प्रक्रिया बाकी आहे. नायगावमध्ये संयुक्त मोजणीद्वारे या प्रक्रियेला सुरूवात होणार होती. त्याकरिता रविवारी मध्यरात्रीच पोलिसांनी विरोध करणाऱ्या दोन ते तीन शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. प्रशासनाने दहशत व दबाव तंत्राचा वापर करून मोजणीचे काम सुरू केल्याचा आरोप संबंधितांनी केला आहे. दरम्यान, या संदर्भात जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, स्थानिकांकडून होणारा विरोध लक्षात घेऊन फौजफाटा नेण्यात आल्याचे मान्य केले. त्या परिसरातील ७० टक्के शेतकऱ्यांची रेल्वे मार्गासाठी जमीन देण्यास संमती दिली आहे. काही जणांनी संमती दिली नसली तरी संयुक्त मोजणी ही करावीच लागते. गतवेळी मोजणी करणाऱ्या काही अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी ग्रामस्थांकडून गायब झाले होते. यामुळे जादा बंदोबस्त ठेवण्याची सूचना करण्यात आली होती.
असा आहे रेल्वे मार्ग..
शासनाच्या अधीसूचनेप्रमाणे हा रेल्वे मार्ग नाशिक तालुक्यातील एकलहरे, हिंगणवेढे, जाखोरी, निफाड तालुक्यातील पिंपळगाव निपाणी, सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभे, नायगाव, देशवंडी, पाटपिंप्री, बारागाव पिंप्री व गुळवंच असा असणार आहे. हा मार्ग महानजकोच्या ओढा ते एकलहरे मार्गाला समांतर राहणार असून सध्याच्या मार्गालगत नवीन रेल्वे मार्ग असणार आहे.