घरभाडे थकल्याने मालकाने महिलेला घरातून बाहेर काढले

वसईच्या पश्चिम परिसरातील गोकुळ आनंद सोसायटीत कविता अय्यर (३५) या भाडेतत्त्वावर राहत आहेत.

विरार : करोनाकाळात भाडय़ाने राहणाऱ्या व्यक्तीकडून भाडेवसुलीची सक्ती करू नये असे शासनाने सांगूनही वसईतील एका महिलेला तिच्या घरमालकाने तीन महिन्यांचे भाडे दिले नाही म्हणून घरातून बाहेर काढले आहे. या संदर्भात महिलेने माणिकपूर पोलिसांकडे मदत मागितली आहे. परंतु अजूनही या महिलेला घरमालकाने घराच्या चाव्या दिल्या नाहीत. यामुळे ही महिला मागील पाच दिवसांपासून रस्त्यावर राहत आहे.

वसईच्या पश्चिम परिसरातील गोकुळ आनंद सोसायटीत कविता अय्यर (३५) या भाडेतत्त्वावर राहत आहेत. सध्याच्या करोना महामारीमुळे मागील तीन महिन्यांपासून त्यांचे काम बंद होते. यामुळे त्या आपल्या घराचे तीन महिन्यांचे भाडे देण्यास असमर्थ होत्या. दरम्यान, मालक त्यांच्या मागे घरभाडे देण्याचा तगादा लावून होता. आता टाळेबंदीत शिथिलता आल्याने त्यांचे काम सुरू झाले आहे. लवकरच आपण भाडे देऊ असे त्यांनी मालकाला सांगितले. पण मालकाने त्या कामावर गेल्या असता घराचे कुलूप बदलून टाकले.

कविता अय्यर यांनी माहिती दिली की, ऑक्टोबर २०१९ पासून या ठिकाणी राहत आहेत. त्यांनी यासाठी ३५ हजार रुपये बयाना रक्कम दिली आहे. घराचे भाडे ८ हजार रुपये आहे. नियमित भाडे देत आहोत, पण सध्या काम बंद असल्याने भाडे भरू शकलो नाही. आता काम सुरू झाले आहे. घरमालकाने मला अवधी द्यावी. मी सर्व भाडे निश्चितपणे देईल.

सदर महिलेला आणि घरमालकाला आम्ही बोलावले आहे. त्यांच्याशी बोलून हा विषय सोडवला जाईल, अन्यथा आम्ही कायदेशीर कारवाई करू.      

– राजेंद्र कांबळे,  वरिष्ठ पोलीस निरीक्षक, माणिकपूर पोलीस ठाणे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Landlord kicked the woman out of the house for not paying rent zws