खेड तालुक्यातील नातूनगर हुंबरवाडीजवळ रस्त्यावर कोसळलेल्या दरडीमुळे अडचणीत वाट काढून जात असतानाच दुसऱ्या बाजूने मोठा दगड घरंगळत आल्याने भागोजह रामजी सुतार (वय ६०) आणि परशुराम शिवराम सुतार (६०, दोघे रा. तुळशी, ता. खेड, जि. रत्नागिरी) या दोन वृद्ध मजुरांचा ६० फूट खोल दरीत कोसळून मंगळवारी पहाटे मृत्यू ओढवला. रस्त्यावर कोसळलेली दरड दहा तास उलटूनही न हटवल्यानेच या दोघांना प्राणास मुकावे लागले, असा स्थानिकांचा आरोप असून तुळशी गावात शोककळा पसरली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर कोंडी
अलिबाग : सुकेळी खिंडीत मंगळवारी सकाळी दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.  साधारणपणे दोन ते तीन किलोमीटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली. सोमवारी संध्याकाळी अंबेनळी घाटात दरड कोसळल्याने महाबळेश्वर-पोलादपूर दरम्यानची वाहतूक बंद झाली होती. मंगळवारी सकाळी ११ वाजता ही दरड हटवण्याचे काम पूर्ण झाले.