देवरुख आणि गुहागर पाठोपाठ आता लांजा नगर पंचायतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली असून जिल्हा प्रशासनाने या नगरपंचायतीचे काम हाती घेतले आहे. दरम्यान, नगर पंचायतीच्या निर्मितीमुळे यापुढे लांजा पंचायत समिती गण रद्द होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्य़ातील गुहागर व देवरुख ग्रामपंचायती बरखास्त करून त्यांचे नगर पंचायतीत रूपांतर करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून या नगर पंचायतींमध्ये प्रत्येकी १७ सदस्य राहणार आहे. देवरुख व गुहागर नगर पंचायतीचे प्रत्येकी चार प्रभाग पाडण्यात आले आहेत. या दोन्ही नगर पंचायतीची ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच आता लांजा नगर पंचायत स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित होता. गुरुवारी सायंकाळी या संदर्भातील अधिसूचना शासनाने जारी करून लांजा नगर पंचायतीच्या निर्मितीला हिरवा कंदील दिला आहे. नव्याने अस्तित्वात यावयाच्या लांजा नगर पंचायतीमध्ये लांजा, आगरगाव, गोंडेसखाल, धुंदेरे, कुळे, पुरागाव, गवाणे आणि रामाणे या आठ गावांचा समावेश केला जाणार आहे. लांजा नगर पंचायतीमध्ये लांजा पंचायत समिती गणाचा समावेश झाल्याने हा गण रद्द होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. नगरपंचायत स्थापनेसंदर्भात शासनाने अधिसूचना जारी केल्याने येत्या काही दिवसात त्याची कार्यवाही सुरू केली जाणार आहे. दरम्यान, पालकमंत्री भास्कर जाधव यांनी देवरुख, गुहागर व लांजा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याबाबतचे दिलेले आश्वासन पूर्ण केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.