लातूर लोकसभा मतदारसंघात सरासरी ६५ टक्के मतदान झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मतदानाची अधिकृत माहिती उशिरापर्यंत मिळू शकली नाही.
सायंकाळी पाचपर्यंत ५७.८८ टक्के मतदान झाले. निलंगा विधानसभा मतदारसंघात ६२.४५ टक्के, उदगीर ६९ टक्के, अहमदपूर ५९.६९ टक्के, लातूर ग्रामीण ५९.६५ टक्के, लातूर शहर ५५.१५ टक्के, तर लोहा मतदारसंघात ५१.२२ टक्के मतदान झाले. सकाळी सातपासूनच अनेक केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा होत्या. सकाळी ७ ते ९ दरम्यान जिल्हय़ात ८.६० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ९ ते ११ दरम्यान मतदानाने चांगला वेग घेतला व या वेळेत २०.२९ टक्के मतदान झाले. ११ ते १ या वेळेत मतदानाची टक्केवारी ३२.७०पर्यंत पोहोचली. दुपारी १ ते ३ दरम्यान ४७ टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते.
अखेर टाकळगावकर राजी
अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी सकाळपासून गावकऱ्यांबरोबर चच्रेच्या फेऱ्या केल्या व दुपारी साडेअकरा ग्रामस्थ मतदानाला तयार झाले. त्या वेळी एका केंद्रावर पाच जणांनी व दुसऱ्या केंद्रावर दोघांनी मतदान केले होते. अधिकाऱ्यांनी लक्ष घातल्यामुळे हे मतदान सुरू होऊ शकले.
या वेळच्या मतदानात मध्यमवर्गीयांची आकडेवारी अधिक असल्याचे जाणवत होते. लातूर शहरात सधन भागातील मंडळी मतदानाला फारशी बाहेर पडत नसत. या वेळी या मंडळींनी मतदानात उत्साह दाखवला. ग्रामीण भागात मतदानाची आकडेवारी चांगली आढळून आली. मुस्लिम व दलित समाजातील मतदारांनीही उत्साहात मतदान केले. निवडणूक यंत्रणेने मतदारांपर्यंत मतदानपत्रिका घरोघरी पोहोचवल्यामुळे मतदान केंद्रांवर जाऊन लोक मतदान करीत होते. मतदान केंद्राबाहेर मतदारांना मदत करण्यासाठी उभारलेल्या स्टॉलचा फारसा उपयोग झाला नाही. मतदार थेट जाऊन मतदान करीत होते, हे बऱ्याच ठिकाणी पाहावास मिळाले.
मतदारांना घरापासून मतदान केंद्रापर्यंत आणण्यास विविध राजकीय पक्षांची यंत्रणा कार्यरत असते. या वेळी मात्र हे चित्र अभावानेच दिसले. मतदारांना घरापासून मतदान केंद्रापर्यंत वाहनाची व्यवस्था नसतानाही लोक स्वयंस्फूर्ततेने मतदान करीत असल्याचे पाहावयास आले. मातोश्री वृद्धाश्रमातील ५० वृद्धांना पहिल्यांदाच नव्याने मतदानाचा अधिकार मिळाल्यामुळे त्यांच्यात उत्साह दिसून आला. सुखदेव जामकर (वय १०५) व तान्हूबाई जानकर (वय १००) या ज्येष्ठांनीही मतदानाचा हक्क बजावला.
पावसाची हजेरी
दुपारी अडीचनंतर जिल्हाभरात पावसाने चांगली हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह लातूर शहरात सुमारे अर्धा तास पावसाच्या सरी बरसल्या. शिरूर अनंतपाळ, उजेड, बोरी, चाकूर आदी गावांत कमीअधिक प्रमाणात सरी बरसल्या. लातूर शहरात अर्धा तास पाऊस सुरू असल्यामुळे काही काळ मतदानावर परिणाम झाला. मतदानाच्या रांगा पावसामुळे थांबल्या होत्या. पाऊस थांबल्यानंतर लोक पुन्हा मतदार बाहेर पडले. दुपारपासून पावसाळी वातावरण असल्यामुळे उन्हाची तीव्रता मात्र दिवसभर कमी राहिली.