विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास १० डिसेंबरपासून प्रारंभ होणार असला तरी प्रत्यक्ष सचिवालयाचे कामकाज उद्या, सोमवारपासून सुरू होणार आहे. यंदा प्रथमच पंधरा दिवस आधी  सचिवालय नागपुरात डेरेदाखल झाले आहे.
 विधिमंडळ सचिवालयाच्या ग्रंथालय, प्रश्न शाखा, लक्षवेधी आदी विविध विभागांतील कर्मचारी शनिवारी नागपुरात आले. १६० खोल्यांच्या गाळ्यात त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवारपासून विविध कागदपत्रे, फायली लावणे वगैरे सचिवालयाच्या कामास सुरुवात होईल. सुरक्षा यंत्रणेने आधीच विधानभवनाचा ताबा घेतला आहे. विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांनी शनिवारी नागपुरात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विधानभवन, नागभवन, रविभवन, १६० खोल्यांचे गाळे येथील व्यवस्था तसेच अधिवेशनाच्या तयारीसंबंधी त्यांनी आढावा घेतला.
हिवाळी अधिवेशनाचे कामकाज तूर्त २१ डिसेंबपर्यंत ठरले आहे. पहिल्या दिवशी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे व इतर दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करून कामकाज तहकूब होईल. दुसऱ्या दिवसापासून प्रश्नोत्तरे व इतर कामकाज होईल. कामाचे तास वाढावेत, जास्तीत जास्त कामकाज व्हावे, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती आहे. प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्याची परंपरा खंडित करून इतर कामकाजातही गोंधळ होणार नाही, यासाठी सर्वपक्षीय बैठक घेतली जाणार आहे.
 येत्या ३ डिसेंबरपासून लक्षवेधी स्वीकारल्या जाणार असून अधिवेशन कालावधी वाढविण्यासंबंधी     संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, अधिवेशनात सिंचन व इतर विविध मुद्दय़ांवर सरकारला अडचणीत आणून अधिवेशनाचा कालावधी वाढवून घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. सरकारविरुद्ध अनेक प्रकरणे पुराव्यानिशी संकलित करण्यात आली आहेत. जलसिंचनावरील श्वेतपत्रिकेकडे सर्वाचेच लक्ष राहणार आहे. सत्तारूढ सदस्यांनीही सरकार अडचणीत येणार नाही, या दृष्टीने तयारी केली आहे. युती सरकार, रखडलेले प्रकल्प, त्यावरील वाढता खर्च तसेच वेळोवेळी करण्यात आलेले बदल गृहीत धरून ही श्वेतपत्रिका तयार केली जात आहे. श्वेतपत्रिकेवरून विरोधकांनी सभागृहाचे कामकाज ठप्प पाडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना रोखण्यासाठी ‘पूर्ती’ने प्रत्युत्तर देण्याची रणनीती आहे.
मुंबई महापालिकेचा ७०२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार, खड्डे बुजविण्यासाठी वाहनांची खरेदी पण त्यांचा न झालेला वापर या मुद्दय़ांनी विरोधकांना अडचणीत आणण्याची सत्तारूढ सदस्यांची तयारी आहे.