समोरचा वार चुकविता येतो, पाठीमागून होणाऱ्या वाराची चाहूल लागते, आजुबाजूचा वार नजरेच्या टप्प्यात असतो, मात्र आभाळातून डोकीवर पडलेला घाला कसा चुकविणार? गारपिटीने जिल्ह्य़ातील ७२ हजार हेक्टरवरील शेती उद्ध्वस्त झाली. आभाळच फाटल्यावर शासनाच्या तुटपुंजी मदतीने ठिगळ कुठे पुरणार? हा यक्ष प्रश्न जिल्ह्य़ातील गारपीटग्रस्त आणि दुष्काळग्रस्त तालुक्यातील भूमिपुत्रांपुढे उभा ठाकला आहे.
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून सांगलीजिल्ह्य़ाच्या दुष्काळी म्हणून गणल्या जाणाऱ्या जत, आटपाडी, तासगांव, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यांत गारपिटीने शेती व्यवसायच उद्ध्वस्त केला. गारपिटीसोबत आलेल्या वादळवाऱ्यासह अवकाळी पावसाने अंतिम टप्प्यात असणारी रब्बी पिके, बहराला आलेली फळ पिके उद्ध्वस्त केली. केवळ शेतीच उद्ध्वस्त केली नाही, तर मातीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या बळीराजाची मनेही उद्ध्वस्त झाली आहेत.
या अस्मानी संकटामध्ये कवलापूर (ता. मिरज) येथील मारुती विजय नलवडे याची ४० गुंठे असणारी कोबी भाजीपाल्याची शेती उद्ध्वस्त झाली. कर्जाचा डोंगर माथी असणाऱ्या या तरुण शेतकऱ्याने नसíगक संकटात मायबाप सरकारकडून ठोस मदत मिळणार नाही हे गृहीत धरून जीवनयात्राच संपविली. या तरुणाच्या घरी घटना घडून १५ दिवसांचा अवधी झाला तरी शेती त्याच्या नावे नसल्याने सरकारी मदतीचा धनादेश अद्याप पोचलाच नाही. शासन त्याला १ लाख रुपये देण्यास तयार आहे. मात्र, आचारसंहितेमुळे बठक होऊ शकत नाही. परिणामी मदतीचा विचार होऊ शकलेला नाही.
आटपाडी तालुक्यात पळसखेड येथे आर्या रंगनाथ गुदावले हे ९ महिन्याचे बाळ आणि दहीवडी (ता. तासगांव) येथील लोचना जनार्दन जाधव ही महिला नसíगक प्रकोपाच्या बळी पडल्या. बालक म्हणून ५० हजार, तर महिला म्हणून दीड लाखाची मदत शासनाने दिली.
करंजे (ता. खानापूर) येथील द्राक्षबाग उद्ध्वस्त झाली. खानापूर-विटा परिसरात तासगांव तालुक्यातील मांजर्डे, बिरनवाडी, वायफळे, जत तालुक्यातील मुचंडी, दरीबडची आदी परिसरात अवकाळीने केलेले नुकसान कोटय़वधी रुपयांचे आहे. साल बेजमीची तयारी अंतिम टप्प्यात असताना झालेला नसíगक प्रकोप मोजदाद करण्यापलीकडला आहे.
मिरजेचा काही भाग, खानापूर, तासगांव, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ या दुष्काळी टापूतच अवकाळीने गारपिटीसह धुमाकूळ घातला. जिवापाड जपलेले द्राक्ष पीक डोळयासमोर उद्ध्वस्त झाले. आता त्या उत्पादनासाठी काढलेल्या कर्जाची फेड कशी करायची आणि पुढच्या वर्षांची तजवीज काय करायची हा यक्ष प्रश्न आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. या कालावधीत राजकीय नेत्यांनी दौरे केले. पाठीवर हात फिरविला. पण या हातात मदतीचा ठोस ओलावा कोठे आढळला नाही. शासनाकडून मिळणारी मदत उत्पादन खर्चाशी तुलना करता अत्यल्प आहे. दुष्काळी पट्टयात मोठय़ा जिद्दीने निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेणारा बळीराजा आता नवऱ्यान मारलं, पावसानं झोडपलं, तर दाद कोणाकडे मागायची असे म्हणत आपल्या नशिबालाच दोष देत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Mar 2014 रोजी प्रकाशित
तुटपुंज्या मदतीचे ठिगळ कुठे पुरणार ?
समोरचा वार चुकविता येतो, पाठीमागून होणाऱ्या वाराची चाहूल लागते, आजुबाजूचा वार नजरेच्या टप्प्यात असतो, मात्र आभाळातून डोकीवर पडलेला घाला कसा चुकविणार?

First published on: 22-03-2014 at 04:05 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Less compensation to hailstorm victim farmers