दिगंबर शिंदे

सांगली : सांगलीत यावेळी संजयकाका पाटील, विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील अशी तिरंगी लढत झाली असली तरी खरी लढत भाजप विरुद्ध बंडखोर अशीच झाली. प्रारंभी एकतर्फी वाटत असलेली ही लढत काँग्रेसचे विशाल पाटलांच्या बंडखोरीने अंतिम क्षणी चुरशीची झाली. दुसरीकडे महायुती विरुद्ध महाआघाडी असा संघर्ष होण्याऐवजी सांगलीत आघाडीअंतर्गतच लढतीचा पट रंगला.

yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
nitin gadkari sanjay raut narendra modi amit shah
“…म्हणून देवेंद्र फडणवीस नाईलाजाने प्रचारात उतरले”, गडकरींचा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा; मोदी-शाहांना केलं लक्ष्य!
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

भाजपने पहिल्या टप्प्यातच विद्यामान खासदार संजयकाका पाटील यांची उमेदवारी जाहीर करून बाजी मारली होती. याचा लाभ उठवत पाटील यांना मतदारांपर्यंत पोहचण्यास आणि आपली भूमिका मांडण्यास अतिरिक्त वेळ मिळाला. अगदी जतच्या या टोकापासून कडेगावच्या दुसऱ्या टोकापर्यंत भाजपचे चिन्ह आणि उमेदवार पोहचण्यास कार्यकर्त्यांची फळीही सक्षम होती. दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधात उमेदवार कोण हा प्रश्न अखेरच्या क्षणापर्यंत लटकत राहिला. ठाकरे गटाने हट्टाने जागा मिळवत चंद्रहार पाटील यांची उमेदवारी परस्पर जाहीर केली तरी ही जागा त्यांना सक्षणपणे लढवता आली नाही. सेनेच्या या उमेदवारीने सांगलीत सत्ताधारी- विरोधक असा सामना होण्याऐवजी आघाडीअंतर्गतच संघर्ष अखेरपर्यंत राहिला.

हेही वाचा >>>“…म्हणून एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर बसून पहारा देतायत”, सुनील राऊतांचा टोला

दुसरीकडे, वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने या लढतीत अंतिम क्षणी चुरस निर्माण झाली. दादा घराण्याला जाणीवपूर्वक डावलण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप करत या निवडणुकीतील खलनायक म्हणून आघाडीतील ज्येष्ठ नेत्याच्या नावाची चर्चा घडली. आमदार जयंत पाटील यांनी याबाबत वारंवार खुलासा करूनही हा मुद्दा सर्वाधिक चर्चेत राहिला. दुसरीकडे विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी अंतिम क्षणापर्यंत आग्रही राहिलेल्या माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या उघड नाराजीची भरही या निवडणुकीत पडली. शिवसेनेने मागणी करूनही काँग्रेसने बंडखोरीवर कारवाई टाळली यावरून अप्रत्यक्षपणे विशाल पाटलांना बळच मिळाले. आघाडीतील या बेबनावामुळे सांगलीतील लढत सत्ताधारी-विरोधक अशी असताना ती महाविकास आघाडीअंतर्गतच जास्त रंगली.

ही निवडणूक वरवर जरी भाजप विरुद्ध अपक्ष अशी दिसत असली, तरी खरा सामना काँग्रेसचे आ. डॉ. विश्वजीत कदम आणि आमदार जयंत पाटील यांच्यातच झाल्याचे दिसले. निकालानंतर या जिल्ह्याचे नेतृत्व कोणाकडे हेही या निवडणुकीने मतदार सांगणार आहेत.

तिरंगी लढतीने निकालाबाबत कुतूहल

दयानंद लिपारे

कोल्हापूर : दुरंगी लढतीसाठी वर्षानुवर्षे ओळखला जाणारा हातकणंगले लोकसभा मतदारसंघ यंदा तिरंगी लढतीने लक्षवेधी ठरला. शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांच्यातील सामन्याचा निकाल कसा लागेल याचा संभ्रम वाढला आहे. तिघाही उमेदवारांचा तीन लाखांची मजल जाईल, असा अंदाज आहे. पुढच्या मतांचे वळण कसे राहील, त्यात जो बाजी मारेल, त्याच्या गळ्यात खासदारकीची माळ पडण्याची चिन्हे आहेत.

तसे पाहता या मतदारसंघात महायुतीच्या प्रचाराला अंमळ उशिराने सुरुवात झाली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तिन्ही नाराज आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी बैठका घ्याव्या लागल्या. त्यानंतर यंत्रणा गतिमान झाली असली, तरी नाराजीची तीव्रता कितपत कमी झाली हा मुद्दा आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कडवट हिंदुत्ववादी भाषणाने इचलकरंजीच्या मैदानात चांगली हवा निर्माण केली. गेल्या वेळी माने यांच्या विजयाची भिस्त राहिली ती इचलकरंजी मतदारसंघावर. या वेळी इचलकरंजी व हातकणंगले विधानसभा या दोन विधानसभा मतदारसंघांत ते मताधिक्याचा आकडा किती गाठतात यावरच त्यांचे यश अवलंबून राहील.

वाळवा, शिराळा, पन्हाळा – शाहूवाडी येथे सरूडकर यांना कितपत पाठबळ मिळणार यावर त्यांचा निकाल अवलंबून असणार आहे. नेहमीप्रमाणे ऊसउत्पादक शेतकरी, ग्रामीण भागातील मतदार यावर राजू शेट्टी यांची भिस्त आहे.

हातकणंगलेत जातीय समीकरणांनाही महत्त्व प्राप्त झाले आहे. मराठा समाजाने गेल्या वेळी माने यांची पाठराखण केली. या वेळी तो माने आणि सरूडकर यांच्यात विभागला जाण्याची शक्यता बोलली जात आहे. मतदारसंघात जैन समाज दीड लाखाच्या आसपास आहे. यातील किती वर्ग शेट्टी यांच्यामागे जातो हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. मागील निवडणुकीवेळी ‘वंचित’च्या उमेदवारास मिळालेली सव्वा लाखाची मते ही मुस्लीम, मागासवर्गीय यांची होती. यंदा त्यांची ही मते नेमकी कोणाला साथ देतील यावरही विजयाचे समीकरण अवलंबून असणार आहे.

धाराशिवचा कौल बार्शी, औसा मतदारसंघावर अवलंबून

छत्रपती संभाजीनगर : मशाल चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या ओमराजे निंबाळकर यांचा संपर्क जिंकणार, की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या प्रतिमेसह राष्ट्रवादीच्या घड्याळाची ताकद वाढणार हे धाराशिवकरांसमोर मोठे कोडे बनले आहे. बार्शी, औसा या दोन धाराशिव जिल्ह्याबाहेरील विधानसभा मतदारसंघातील कौल कोणाच्या बाजूला झुकतात यावर उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीचा कौल अवलंबून असणार आहे.

राणा जगजीतसिंह पाटील यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे न दिसणारे घड्याळ हे चिन्ह अर्चना पाटील यांच्या प्रवेशानंतर उस्मानाबादच्या राजकारणात पुन्हा आले. तत्पूर्वी शिवसेनेचा धनुष्यबाण उचलणारे हात वाढले. मंत्री तानाजी सांवत, ज्ञानराज चौगुले, माजी खासदार रवींद्र गायकवाड, अनिल खोचरे ही मंडळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करू लागली आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूला जिल्हाभर संपर्क असणारे ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील ही जोडगोळी राहिली. तसा उस्मानाबाद जिल्हाचा राजकीय पट राणा जगजीतसिंह पाटील विरुद्ध सारे असा होता. पण भाजपने त्यात खूप मोठे बदल घडवून आणले. बसवराज पाटील आणि राणा जगजीतसिंह पाटील एकाच बाजूला आले. त्यात तानाजी सावंत यांचीही भर पडली. सारे मोठे नेते एका बाजूला आणि सर्वसामान्यांशी संपर्क वाढवणारे आमदार आणि खासदार दुसऱ्या बाजूला, लोकसभेची लढत ही अशी अटीतटीची.

राज्यातील महिला उमेदवारांमध्ये सुवर्ण संपन्न उमेदवार असणाऱ्या अर्चना पाटील यांना त्यांचेच चिन्ह नकोसे झाले असल्याचा प्रचार पहिल्या टप्प्यात झाला. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. या सभेत त्यांनी मराठवाड्यातील पाणी प्रश्नाला हात घातला. टेक्सटाईल पार्क, तुळजाभवनी मंदिराचा विकास, रेल्वे विकास असे अनेक प्रश्न चर्चेत आणले गेले. भाजपची ताकद राष्ट्रवादीबरोबर मिळाली, तरीही या निवडणुकीमध्ये ‘राष्ट्रवादी’ची दमछाक झाल्याची चर्चा मतदानानंतर सुरू होती. खरे तर हा मतदारसंघ महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला सोडायचा यावरून बरीच चर्चा सुरू होती. शेवटी अजित पवार यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे विजय झाला तर अजित पवार यांचा आणि पराभव झाला तर राणा जगजीतसिंह यांचा मानला जाईल.

ओमराजे निंबाळकर यांनी प्रचारात वेगवेगळे हातखंडे वापरले. अगदी तरुणांमध्ये क्रिकेट खेळण्यापासून ते समस्या सांगणाऱ्याला समाधान वाटेल असा संपर्क त्यांनी ठेवला होता. या उलट राजकीय रणनीती आखून कधीच निवडणूक न लढलेल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपने चांगली रचना लावली होती. त्यामुळे उस्मानाबादची लढतही शेवटी अटीतटीची झाली.

प्रचाराबरोबरच जातीय समीकरणे महत्त्वाची

एजाजहुसेन मुजावर

सोलापूर : कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात यंदा भाजप आणि काँग्रेससाठीही अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची लढाई आहे. दोन्ही बाजूंनी ही लढाई अत्यंत चुरशीची झाली आहे. यात धार्मिक ध्रुवीकरणासह प्रभावशाली लिंगायत, पद्माशाली आणि ओबीसी वर्गाचा पाठिंबा ही भाजपची जमेची बाजू दिसत असतानाच स्थानिक विकासाचे मुद्दे, शेतकरी वर्गातील नाराजी हे मुद्दे काँग्रेसकडून चर्चेत आले.

देशात भाजपचा विस्तार होत असतानाच २०१४ आणि २०१९ असे सलग दोन वेळा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना या मतदारसंघात अगदी नवख्या उमेदवारांकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला होता. २०१४ नंतर या मतदारसंघातच नव्हे, तर जिल्ह्यात भाजपने आपली वाढवलेली ताकत, बहुसंख्य लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांचे संघटन ही त्यांची प्रत्येक निवडणुकीत जमेची बाजू ठरली. यंदाही हेच जाळे घेऊन भाजपचे उमेदवार राम सातपुते रिंगणात उतरले आहेत.

दुसरीकडे काँग्रेसकडून शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे लढतीत दाखल झाल्या आहेत. यंदा त्यांच्या बाजूने भाजपविरोधी काहीशी नाराजी, शेतकऱ्यांचे प्रश्न हे मुद्दे चर्चेत राहिले. २०१९ मध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीने मोठ्या प्रमाणात मतविभागणी झाली होती. यंदा सोलापुरात ‘वंचित’च्या उमेदवाराअभावी ही मतविभागणी टळली आहे. ती काँग्रेससाठी फायद्याची ठरणार आहे. यंदा आरक्षणाच्या लढ्यावरून अस्वस्थ असलेला मराठा समाजाने प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात प्रणिती शिंदे यांना अनेक गावांत विरोध केला होता. त्यामुळे हा समाज मतदानातून कुठे व्यक्त होतो हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सोलापूरमध्ये लिंगायत, पद्माशाली आणि ओबीसी वर्ग प्रभावशाली आहे. या वर्गाचा आजवरचा पाठिंबा ही भाजपची जमेची बाजू मानली जाते. याशिवाय धनगर समाजाचे मतदानही लक्षवेधी ठरणार आहे.

मतदारसंघात सहापैकी पाच आमदार महायुतीचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांसह प्रचाराचे सूक्ष्म नियोजन, यशस्वी बूथ यंत्रणा यामुळे विजयाबाबत भाजप निश्चिंत आहे. प्रणिती शिंदे यांच्यासाठी राहुल गांधी यांच्या सभेचा अपवादवगळता मोठ्या सभा झाल्या नाहीत. एकूणच राजकीय प्रचाराचा जोर आणि जातीय समीकरणे यावर सोलापूरचा निकाल अवलंबून आहे.