आजपासून नऊ दिवस आपण सुरू करतो आहोत, नवदुर्गाचा जागर! या दुर्गा आहेत तुमच्या आमच्यातल्याच, मात्र आपल्यातल्या सामान्यत्वाला कर्तृत्वाचं लखलखीत कोंदण देत त्यांनी करून दाखवलं असामान्य काम. विधेयक कामाला वेगळा आयाम देत अनेकांच्या आयुष्यात फुलवलं नवचैतन्य, दिला भरभरून आनंद! आजच्या पहिल्या नवदुर्गा आहेत, प्रमिलाताई कोकड. जव्हार परिसरातील आदिवासींच्या विकासासाठी त्यांनी स्थापन केली आहे, ‘बहुउद्देशीय श्री गुरुदेव सामाजिक संस्था. त्याअंतर्गत असलेल्या ‘गुलमोहर’ या दृष्टिहीन व मतिमंद मुलांच्या शाळेत ११० मुलं असून त्यातील ६० मतिमंद आहेत. शालेय शिक्षणाबरोबरच त्यांच्या पुनर्वसनावर भर देतानाच परिसरातील आदिवासींचे जीवनमान उंचावणाऱ्या प्रमिलाताईंच्या कर्तृत्वाला सलाम!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मायमाऊली’ हे बिरुद ज्यांना चपखल बसेल अशा प्रमिलाताई कोकड! १९८६ पासून म्हणजे सुमारे ३० वर्षांपासून त्यांनी जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासींच्या विकासासाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. त्यासाठी त्यांनी स्थापन केली आहे, ‘बहुउद्देशीय श्री गुरुदेव सामाजिक संस्था.’ त्याअंतर्गत सुहासिनी महिला पतसंस्थेची स्थापना असो की पाडय़ापाडय़ांवर सुरू केलेले बचत गट, आदिवासींना स्वावंलबी बनवणे, त्यांना आर्थिक स्वतंत्र करणे हा त्यामागचा उद्देश. मात्र त्याही पलीकडे त्यांचे मोलाचे काम आहे ते ‘गुलमोहर’ ही दृष्टिहीन व मतिमंद मुलांची शाळा! आज या शाळेत ६० मतिमंदांसह ११० मुले आहेत. या मुलांना स्वावलंबी करत त्यांचे पुनर्वसन करणे हे त्यांचे जीवितकार्य बनले आहे.
प्रमिलाताई मूळच्या ठाण्याच्या. सर्व भावंडांत त्या मोठय़ा. आदिवासी मुलांसाठी विधायक कार्य करण्याची त्यांची महाविद्यालयापासूनची इच्छा होती. टिळक विद्यापीठातून ‘कर्णबधिरशिक्षण प्रशिक्षण’ या विषयात त्यांनी बी.एड. केलं. त्याच दरम्यान ‘प्रगती प्रतिष्ठान’ संस्थेतर्फे जव्हारला कर्णबधिर मुलांसाठी शाळा स्थापन करण्यात आली. कार्याध्यक्ष वसंतराव पटवर्धन यांच्या आमंत्रणावरून १९८६ मध्ये आताच्या ‘नीलेश मुरडेश्वर कर्णबधिर विद्यालय’ शाळेत त्या रुजू झाल्या. या शाळेच्या मुख्याध्यापिका असताना त्यांना आदिवासी समाजाचे जगणे अस्वस्थ करू लागले आणि त्यांनी अंधश्रद्धा, निरक्षरता, व्यसनाधीनता, रोगराई, अस्वच्छता या दुष्टचक्रात अडकलेल्यांसाठी अनेक उपक्रम सुरू केले. नगरपालिकेच्या मदतीने रक्तदान शिबीर, दात तपासणी, ग्रामीण स्वच्छता आदी उपक्रमही राबवले. त्यासाठी २३ मे १९९४ ला त्यांनी ‘सुहासिनी महिला पतसंस्थेची’ स्थापना केली. त्याचे फलस्वरूप म्हणून आज अनेक आदिवासी महिला स्वावलंबी झाल्या आहेत. मोखाडा, खोडाळा, विक्रमगड हे या पतसंस्थेचे कार्यक्षेत्र. त्यात सहा कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवी जमा झाल्या आहेत. ४.५० कोटी रुपयांपर्यंत कर्जे दिली गेली आहेत. त्यातूनच अनेक छोटय़ा- मोठय़ा उद्योगांना चालना मिळाली आहे. महत्त्वाचे म्हणजे या कर्जाचा परतावा १०० टक्के आहे. त्यासाठी त्यांनी मदत घेतली आहे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची. ही मुले कर्ज वसुलीसाठी जातात आणि त्याप्रमाणे त्यांना कमिशनही मिळते. लहान वयातच स्वावलंबनाचा धडा त्यामुळे त्यांना मिळतो आहे. इतकेच नव्हे तर प्रमिलाताईंच्या प्रेरणेने पाडय़ापाडय़ांत अनेक बचत गट स्थापन झाले आहेत. त्यातूनही स्त्रियांना छोटी- मोठी कर्ज दिली जातात. चकलीची भाजणी, दिवाळीचे पदार्थ, अनेक प्रकारचे लाडू तयार करून विकणे आदी छोटे उद्योग त्या अंतर्गत राबविले जातात. दिवाळीला दरवर्षी २०० किलोच्या वर पदार्थ संपतात. स्त्रियांच्या आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग असा खुला झाला आहे.
अशा अनेक कार्याना भक्कम स्वरूप आल्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले ते ‘मतिमंद’ व ‘दृष्टिहीन’ मुलांवर. १५ जून २००७ मध्ये त्यांनी ‘गुलमोहर’ या ‘मतिमंद’ व ‘दृष्टिहीन’ ही आदिवासी मुलांसाठी निवासी शाळेची मुहूर्तमेढ रोवली. त्यासाठी अनेक अडचणींचा डोंगर त्यांना पार करावा लागला. प्रथम मुले शाळेत येईनात. ही मुलेही स्वावलंबी होऊ शकतात हे पटवण्यासाठी गृहभेटी मेळाव्यांचे आयोजन केले गेले. प्रथम भाडय़ाची जागा घेतली, मात्र स्वत:ची जागा हवी यासाठी २००८ साली शाळेतून निवृत्त झाल्यावर मिळालेली पुंजी त्यांनी शाळेसाठी दिली. त्यातून दोन एकर जमीन संस्थेच्या नावाने घेतली. त्या वेळचे खासदार प्रकाश जावडेकर यांनी खासदार निधीतून १५ लाख रुपये देणगी दिली. तसेच ‘सेवा इंटरनॅशनल – यू.के.’ या संस्थेनेही शाळेला देणगी दिली. त्यातून आज ८००० चौरस फुटांची इमारत उभी आहे व १००० चौरस फुटांच्या वसतिगृहाचे बांधकाम सुरू आहे. अर्थात कामाच्या तुलनेत ही पुंजीही कमी पडतेय. आज शाळेत ६० मतिमंदांसह ११० मुलं-मुली आहेत. शाळेत शिक्षणाबरोबरच त्यांचे स्वावलंबन, पुनर्वसन यावर भर दिला जातो. त्यांच्यातील कलागुण जोपासले जातात. त्यांना गांधर्व विद्यापीठाच्या परीक्षेला बसवले जाते. त्यांचा ऑर्केस्ट्राही आहे. या वर्षीच्या शिक्षक दिनाला दोन मतिमंद मुलींनी शिक्षिकांची भूमिका बजावली. त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे म्हणून १५ वर्षांपूर्वीपासून ‘वनोत्सव स्पर्धा’ सुरू केल्या जातात. त्यात ही मुले इतकी भान हरपून तारफा नृत्य, घोंगडी नाच करतात की बघणाऱ्याचेही मन हरवून जाते.
या मुलांच्या आयुष्यातील सुख हे प्रमिलाताईंच्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचे क्षण. गेल्या वर्षीच्या डोळे तपासणीसाठी मालाडच्या ‘संजीवनी हॉस्पिटल’चे डॉ. शाम अग्रवाल व सहकारी आले होते. ८ वर्षांचा समाधान, ११चा रंगनाथ व १२ वर्षांची अर्चना ही तीनही मुले जन्मत: अंध. त्यांचे डोळे तपासल्यानंतर डॉ. अग्रवाल म्हणाले, ‘‘यांना जन्मत: मोतीबिंदू आहे. शस्त्रक्रिया केल्यास दृष्टी येण्याची शक्यता आहे.’’ प्रमिलाताई व शिक्षकांमध्ये उत्साह संचारला. पालकांची परवानगी घेतली आणि जनकल्याण समितीचे दिलीप लोखंडे व इतरांच्या मदतीने डॉ. अग्रवाल यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. मुलांना प्रकाशाचा किरण दिसला.
आज या शाळेत प्रशिक्षित निवासी शिक्षक आहेत. ‘‘या सर्व शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना आम्ही पूर्ण वेतन देऊ शकत नाही ही सतत टोचणी मनाला आहे. आज एका मुलाचा वार्षिक खर्च २५ हजार रुपये आहे. दत्तक-पालक योजना सुरू आहे. मात्र त्याला लोकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. सरकारी अनुदान मिळण्यासाठी खटपट सुरू आहे,’’ असे त्या सांगतात.
सध्या त्यांचे आणखी एक महत्त्वाचे काम चालू आहे ते कें द्र शासनाच्या ‘चाइल्ड हेल्पलाइन प्रोजेक्ट’चे. पालघर जिल्हा व आजूबाजूच्या शाळांतील शिक्षकांशी संपर्क साधून १८ वर्षांखालील मुलांच्या समस्या सोडवण्याचा खूपच चांगला, आशादायी प्रयत्न होतो आहे.
त्यांच्या या विविध उपक्रमांची दखल घेऊन अनेक पुरस्कार दिले जातात, तसाच सन्मान माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन करण्यात आला आहे.
अनेक गोष्टी करण्याचे बळ प्रमिलाताईंना आज ६५ व्या वयातही कसं येतं याचं कारण सांगताना त्या म्हणतात, ‘‘मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच माझे टॉनिक.’’

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta 1st durga pramila tai kokad
First published on: 13-10-2015 at 00:50 IST