सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाचा आदेश

धावत्या रेल्वेतून एका उत्तर भारतीय प्रवाशाला बाहेर फेकून त्याची हत्या केल्याबद्दल रोशन मधुकर देवरे (वय २५, रा. आंबेडकर चौक, आजंगवडेल, ता. मालेगाव, जि. नाशिक) यास सोलापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

या खटल्यातील मृत रमेशप्रसाद नेवार हा उत्तर प्रदेशातील प्रवासी २० डिसेंबर २०१५ रोजी पंढरपूर येथून कुर्डूवाडी-मिरज पॅसेंजरमध्ये विकलांगांच्या डब्यात बसून प्रवास करीत होता. त्या वेळी आरोपी रोशन देवरे व उमेश काशिनाथ चव्हाण या दोघांनी जागेवर बसण्याच्या कारणावरून रमेशप्रसादबरोबर भांडण काढले. त्यानंतर रागाच्या भरात रमेशप्रसाद याला जागेवरून बळजबरीने उचलले आणि त्यास रेल्वेगाडीतून बाहेर फेकून दिले. यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार डोळय़ांनी पाहणारे याच डब्यातील अनिल तात्यासाहेब शिंदे व सूरज बबन माने (रा. वाळेखिंडी, ता. जत, जि. सांगली) या दोघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी याच गाडीतून  प्रवास करीत असलेले लोहमार्ग पोलीस ठाण्याचे  सहायक पोलीस निरीक्षक रामदास आवार यांना एका फळविक्रेत्यामार्फत तत्काळ माहिती कळवली. सहायक पोलीस निरीक्षक आवार हे रेल्वेतून मिरजेकडे जात होते. त्यांनी लगेचच हालचाली करून आरोपी रोशन देवरे व उमेश चव्हाण या दोघांना जागेवर पकडून कुर्डूवाडी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. रेल्वेत अनेक प्रवासी असताना त्यापैकी कोणीही पोलिसांना कळविण्याची तसदी घेतली नव्हती. मात्र दोघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी धाडसाने पुढे येऊन आरोपी रोशन देवरे व उमेश चव्हाण यांच्या विरोधात फिर्याद नोंदवली व त्यांना प्रत्यक्ष ओळखलेदेखील.

या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. पाटील यांच्यासमोर झाली. सरकारतर्फे दहा साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादी अनिल तात्यासाहेब शिंदे याच्यासह सहायक पोलीस निरीक्षक रामदास आवार, पोलीस तपास अधिकारी गौतम खरात आदी पाच जणांची साक्ष महत्त्वाची ठरली. या खटल्यातील दुसरा आरोपी उमेश चव्हाण हा जामिनावर सुटल्यापासून फरारी आहे. त्याच्यावर स्वतंत्र खटला चालविण्यात येणार आहे.

या खटल्यात सरकारतर्फे अ‍ॅड. वामनराव कुलकर्णी यांनी, युक्तिवाद करताना फिर्यादी व साक्षीदार हे मृताचे नातेवाईक नाहीत. आरोपींना खोटेपणाने गुंतविण्याचे कोणतेही कारण नाही. आरोपींनी निर्दयपणे खून करण्याच्या हेतूनेच मृत रमेशप्रसाद यास धावत्या रेल्वेतून फेकून दिले. त्यांना दया दाखवणे अयोग्य आहे, असा युक्तिवाद केला. अ‍ॅड. आनंद गोरे यांनीही सरकारतर्फे बाजू मांडली होती. आरोपीतर्फे अ‍ॅड. ए. टी. शिंदे यांनी काम पाहिले.