‘वाढते वयोमान व त्यातून निर्माण होणाऱ्या रजोनिवृत्तीसारख्या समस्यांमुळे महिलांची चिडचीड वाढते. अनेकदा त्यांचे मानसिक संतुलन ढळते. जंगलातील वास्तव्यामुळे त्यांना योग्य उपचारसुद्धा मिळत नाही. त्यामुळे सर्व सहकाऱ्यांनी अशा ज्येष्ठ महिला सदस्यांची विशेष काळजी घ्यावी व त्यांच्याशी प्रेमाने वागावे,’ असा सल्ला नक्षलवादी नेतृत्वाने चळवळीतील सर्व सदस्यांना पत्र पाठवून दिला आहे. सध्याच्या चळवळीत महिलांचा सहभाग ६० टक्क्यावर पोहोचला आहे. महिलांची ही वाढती संख्या लक्षात घेऊनच त्यांची काळजी घेण्याचे धोरण नक्षलवादी नेतृत्व आखत असल्याचे या पत्रावरून स्पष्ट झाले आहे.
‘तीन पिढय़ांनी सक्रिय योगदान दिल्याशिवाय क्रांती यशस्वी होणार नाही,’ या माओच्या प्रसिद्ध वाक्याचा उल्लेख करत देशभरातील सर्व विशेष झोन समित्यांनी सदस्यांना पाठवलेल्या या पत्राची प्रत ‘लोकसत्ता’ला उपलब्ध झाली आहे. सध्याच्या चळवळीत नक्षलबारी आंदोलनात सक्रिय असलेल्या सदस्यांचा सहभाग नाही. त्यानंतर या चळवळीत सक्रिय झालेले अनेक सदस्य आता वृद्धत्वाकडे झुकलेले आहेत. चळवळीत आता नव्याने सामील झालेल्या सदस्यांनी या ज्येष्ठांशी व त्यातल्या त्यात त्यातील महिलांशी कसे वागावे या संबंधीचे मार्गदर्शन या पत्रात करण्यात आले आहे. चळवळीत गेल्या ३० वर्षांंपासून सक्रिय असलेल्या अनेक महिला आहेत. वाढत्या वयोमानामुळे त्यांना रजोनिवृत्तीसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा महिला शारीरिक व मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ असतात. अनेकदा चिडचीड वाढल्याने त्यांचे मानसिक संतुलनसुद्धा ढळते. यावर वैद्यकीय उपचाराचा पर्याय उपलब्ध असला तरी जंगलात ते मिळत नाहीत. अशा महिलांच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण सुद्धा कमी होते. त्यातून अनेक आजार बळावतात. याही परिस्थितीत चळवळीत सक्रिय असलेल्या या महिलांशी नव्या सदस्यांनी अतिशय प्रेमाने वागावे, लहान सहान गोष्टीवरून तणावग्रस्त होणाऱ्या या महिलांची विशेष काळजी घ्यावी, शक्य असेल तर त्यांना औषधे उपलब्ध करून द्यावी, त्यांच्या तक्रारीकडे सहानुभूतीपूर्वक बघावे अस नक्षलवादी नेतृत्वाने पत्रात स्पष्ट केले आहे. अशा महिलांच्या वर्तनाची नोंद प्रत्येक विभागातील प्रमुखांनी घेऊन वार्षिक बैठकीत त्यावर चर्चा करावी, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. एकेकाळी या महिलांनी चळवळीला दिलेले योगदान मोठे आहे ही बाब सर्व सदस्यांनी लक्षात ठेवावी. या समस्यांना सामोरे जाणाऱ्या महिला क्षुल्लक कारणावरून अनेकांच्या तक्रारी करतात. त्याकडे फार गंभीरपणे बघू नये. त्यांचे समाधान होईल याकडे पदाधिकाऱ्यांनी जातीने लक्ष द्यावे, असे या पत्रात पुढे म्हटले आहे. वाढत्या वयोमानामुळे अशा महिलांकडून तसेच ज्येष्ठ पुरुष सदस्यांकडूनसुद्धा चुका होण्याचा संभव असतो. त्याकडे फार गांभीर्याने न बघता समजूतदारपणाचे धोरण अवलंबवावे असेही या पत्रातून सुचवण्यात आले आहे.