अशोक तुपे

कमी पाण्यात व कमी कालावधीत उसापेक्षा जास्त पैसे मिळवून देणारे कांदा हे पीक आहे. या पिकात राज्याची मक्तेदारी होती. पण आता त्याला धक्के बसत असून देशभर कांदा लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे. विशेषत: मध्यप्रदेश या राज्याने आघाडी घेतली असल्याने कांदा व्यापारावर त्याचा दबाव वाढू लागला आहे.

कांदा हे पीक चार ते साडेचार महिन्यात येते. त्याला कमी पाणी लागते. पण उसापेक्षा जास्त पैसे त्यामुळे मिळतात. देशात २५० लाख टन कांदा उत्पादन होते. त्यापैकी निम्मे म्हणजे १२५ लाख टन कांदा राज्यात पिकतो. कांदा पिकाची देशातील आर्थिक घडामोडी या सुमारे ४० हजार कोटींच्या आसपास असतात. उसापेक्षा जास्त पैसे मिळवून देणारे हे पीक आहे. नाशिक, नगर, सोलापूर, पुणे या भागात कांदा सर्वाधिक पिकतो. पण आता लातूर, उस्मानाबाद, बीड, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद या भागातही कांदा वाढला आहे. राज्यात जसा कांदा वाढला तसा तो देशभर वाढत आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश, पष्टिद्धr(१५५)म बंगाल, बिहार, पंजाब, छत्तीसगड, झारखंड, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यात कांदा वाढत आहे. केवळ क्षेत्रच वाढत नाही तर दर एकरी उत्पादन वाढत आहे. त्यामुळे राज्याच्या मक्तेदारीला धक्के बसू लागले आहेत.

देशात २००१ ते २००५ पर्यंत मध्ये कांद्याचे उत्पादन ५५ लाख टन उत्पादन होते. निर्यात केवळ एक लाख टन होती. पण गेल्या १५ वर्षांत हे उत्पादन ५० लाख टनावर गेले. निर्यात ४० ते ४२ लाख टनावर गेली. एकरी उत्पादनही देशात वाढले आहे. आता शिकलेला तरुण वर्ग कांदा पिकाकडे वळला आहे. त्यामुळे आता एकरी सहा क्विंटल पासून ते पंधरा क्विंटलपर्यंत उत्पादन काढले जात आहे. राज्यात अनेक शेतकरी १५ ते २५ टनांपर्यंत उत्पादन काढत आहे. लागवडीखालील क्षेत्र, एकरी उत्पादन याचे सरकारचे आकडे जुनेच आहेत.

चाळीस हजार गावांत लागवड

देशातील एकूण कांदा उत्पादनापैकी ४३ टक्के उत्पादन महाराष्ट्र, १५ टक्के मध्यप्रदेश, ८ टक्के कर्नाटक, ५ टक्के राजस्थान, ४ टक्के कांदा गुजरात व उर्वरित कांदा तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, आदी राज्यात पिकत होता. पण ही आकडेवारी बदलली आहे.

मध्यप्रदेशाचा कांदा उत्पादनात दुसरा क्रमांक होता. पण आता पहिल्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. मध्यप्रदेशात आता ४० हजार गावात कांदा लागवड सुरू झाली आहे. या राज्यात शेतीसाठी पाणी चांगले आहे. नर्मदा सागर प्रकल्पांनंतर बागायती क्षेत्र वाढले आहे. ग्वाल्हेर, रतलाम, मदसोर, साजापुर, खांडवा, देवास, किसनगड, बऱ्हाणपूर, सुजलपूर आदी भागात लागवड वाढली आहे. या राज्यात वेगाने लागवड वाढत आहे.

कांदा उत्पादन वाढल्याने तेथील घाऊक  बाजारात आवकही वाढली आहे. इंदोर, सुजलपूर, साहजापूर, उजैन, रतलाम, बडनेर, निमच, मंदसौर या मंडयामध्ये कांद्याची आवक वाढली आहे. परिणामी आता राज्याचा कांदा मध्यप्रदेशात जाणे बंद झाले आहे. एव्हढेच नव्हे तर उत्तर भारतातील बाजारपेठेवर त्यांनी कब्जा करणे सुरू केले आहे.

राज्यातील नाशिक जिल्ह्य़ातील बाजार समित्यामधील कांदा हा दिल्ली, उत्तरप्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल आदी येथे तर नगर व सोलापूरचा कांदा हा आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगण, तामिळनाडू या दक्षिण भारतात जात होता. पण आता उत्तर भारतात कमी मागणी येत आहे. उत्तर भारतातील बाजारपेठेत आता मध्यप्रदेशच्या काद्याशी स्पर्धा करावी लागत आहे. असे नाशिकचे कांदा व्यापारी सोहन भंडारी यांनी सांगितले.

नगरचे प्रसिद्ध कांदा व्यापारी सुदाम तागड म्हणाले, या वर्षी मध्यप्रदेशचा कांदा हा नगर, राहुरी व घोडेगाव येथे विक्रीला आला होता. कांद्याचे दर वाढल्याने सरकारने निर्यातबंदी केली. आयातीला परवानगी दिली. त्यामुळे दर कमी झाले हे खरे असले तरी मध्यप्रदेशचा कांदा बाजारात आल्याने दर पडले असे ते म्हणाले. देशाच्या विविध बाजारात राज्यातील कांदा विक्रीला जात होता पण आता नगर व नाशिक,पुण्याला मध्यप्रदेशचा कांदा येऊ लागला आहे. त्याचा दर्जा व आकारही चांगला असल्याचे तागड यांनी सांगितले. कांदा विपणन क्षेत्रातील तज्ज्ञ दीपक चव्हाण यांनी मात्र लागवडीचे क्षेत्र किती वाढले याचे आकडे येत नाही तोपर्यंत चित्र स्पष्ट होणार नाही. पण मध्यप्रदेशात कांदा लागवड वाढत आहे. चांगले पैसे मिळत असल्याने सर्वत्र लोक या पिकाकडे वळत असल्याचे चव्हाण यांनी मान्य केले. राष्ट्रीय फळबाग संशोधन व विकास मंडळाचे सेवानिवृत्त संचालक सतीश भोंडे यांनी मात्र मध्यप्रदेशात कांदा लागवडीला क्षेत्राच्या मर्यादा आहेत. लागवडीची आकडेवारी येण्यास कालावधी लागेल असे सांगितले.

भावांतर योजनेचा परिणाम

* मध्यप्रदेशात भावांतर योजना राबविली जाते. त्यामुळे कांद्याला किमान आठशे रुपये हमी भाव मिळतो. शेतकऱ्यांना भावाची शाश्वती आहे.

* भाव वाढल्यावर फायदा होतो. तसेच दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश आदी राज्ये जवळ आहेत. वाहतूक खर्च कमी येतो. त्यामुळे अन्य बाजारपेठेतील संधीचा लाभ घेता येतो.

* शेतकऱ्यांनी दर चांगले मिळतात. नुकसान होत नाही. त्यामुळे मध्यप्रदेशात शेतकरी कांदा लागवडीकडे वळत आहेत.

देशात कांद्याखालीला क्षेत्र व उत्पादकता वाढत आहे. ते २५० लाख टनावरून ४०० लाख टनावर गेले तरी घाबरण्याचे कारण नाही. जगात निर्यातीची मोठी संधी आहे. मात्र निर्यात धोरणात सातत्य हवे, त्यात धरसोड नको. जगभर भारतीय कांद्याला मागणी आहे. कांदा हे मूल्यवर्धित पीक आहे. पाणी, कालावधी व उत्पादन खर्च कमी लागतो. त्यात परवडते. त्यामुळे काद्याकडे शेतकरी वळतात. अधिक उत्पादन देणारे बियाणे विकसित झाले आहे. त्यामुळे उत्पादकता वाढत आहे. पण एक संधी समजून निर्यात धोरण घेतले तर अडचण येणार नाही.

– प्रभाकर शिंदे, व्यवस्थापकीय संचालक, पंचगंगा सीड्स कंपनी.