Eknath Shinde on India Pakistan War: ऑपरेशन सिंदूर यशस्वी करत भारतीय लष्कराने पाकपुरस्कृत दहशतवादाचे कंबरडे मोडले. यानंतर खवळलेल्या पाकिस्तानने गुरूवारी रात्री जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानच्या सीमावर्ती भागात ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय लष्कराने त्यालाही चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानी ड्रोन, क्षेपणास्त्र हाणून पाडले. या घडामोडीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नागपूर येथे माध्यमांशी बोलत असताना शिंदे यांनी पाकिस्तानची लायकी काढली. तसेच भारतावर हल्ला करण्याची त्यांची औकात नाही, असे म्हटले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पाकिस्तानची भारतावर हल्ला करण्याची औकात नाही. ते प्रयत्न करत असले तरी ते अन्नाचे मोहताज आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्यांना धडा शिकवलाच आहे. पण तरीही ते भारताविरोधात काही करत असतील तर भारतीय लष्कर पाकिस्तानचे नाव मिटवून टाकतील. नकाशावरही पाकिस्तान दिसणार नाही. त्यांनी त्यांच्या लायकीत राहिले पाहिजे.
पाकिस्तानच्या तीन फायटेर जेटना पाडण्यात आल्याची माहिती पत्रकाराने शिंदे यांना दिल्यानंतर ते म्हणाले की, हा तर फक्त ट्रेलर आहे. पाकिस्तानने जास्त हुशारी केल्यास त्यांना जशास तसे उत्तर मिळेल. आमच्या सैनिकांनी एकाही सामान्य नागरिकावर हल्ला केला नव्हता. आपल्या सैन्याने फक्त दहशतवादी तळ उध्वस्त केले. पण तरीही पाकिस्तान भारताविरोधात काही कारवाई करत असेल तर त्यांना हे महागात पडेल. पाकिस्तानला याची किंमत मोजावी लागेल, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
बुधवारी (७ मे) भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबविल्यानंतर पाकिस्तानकडून जम्मूच्या सीमेवरील गावांमध्ये बेछूट गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. या हल्ल्यात १६ नागरिकांना प्राण गमवावे लागले. यानंतर गुरुवारी सायंकाळी पुन्हा एकदा पाकिस्तानकडून जम्मू, पंजाबच्या सीमाभागात ड्रोन हल्ले करण्यात आले.
तत्पूर्वी गुरुवारी (८ मे) सकाळी पाकिस्तानने श्रीनगर पासून ते गुजरातच्या भूजपर्यंत पसरलेल्या सीमेवरील भारतीय लष्कराच्या तळावर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. भारताने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत सर्व ड्रोन निकामी केले. याशिवाय थेट लाहोर येथे असलेली डिफेन्स रडार सिस्टिम उध्वस्त केली.