मराठवाडय़ात सतीश चव्हाण यांची हॅट्ट्रिक

सुहास सरदेशमुख लोकसत्ता

Maharashtra News Updates in Marathi
Lok Sabha Election 2024 : देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले “मी नागपुरी, मला…”, इतर बातम्या वाचा एका क्लिकवर…
jayant patil, jayant patil criticize Modi Government, madha lok sabha seat, ncp sharad pawar, lok sabha 2024, election 2024, ed, marathi news, Solapur news, madha news, politics news, election campaign,
ईडी लावा, पक्ष फोडा अन् भाजप वाढवा; मोदी सरकारचा एककलमी कार्यक्रम, जयंत पाटील यांचे टीकास्त्र
Maharashtra Lok Sabha Election 2024
Maharashtra News : सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, महायुतीचे अलिबागमध्ये शक्तीप्रदर्शन
Mumbai Maharashtra News in Marathi
Maharashtra News “इंडि आघाडी म्हणजे कमिशन मिळवणारी, सत्तालोलुप आघाडी”, मोदींची घणाघाती टीका

औरंगाबाद: गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात जातीय समीकरणे जुळविण्यात भाजपला संघटना म्हणून आलेले अपयश, केवळ समाजमाध्यमांमध्ये छायाचित्रे टाकून इतरांना वाईट ठरविणारी प्रचारयंत्रणा, मराठा आरक्षणाच्या धुराळ्यात ध्रुवीकरणाला मिळालेले यश आणि संपर्काचे सातत्य यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सतीश चव्हाण यांच्या अंगावर तिसऱ्यांदा विजयाचा गुलाल पडला. पदवीधरच्या निकालावरून नजीकच्या काळात होणारी औरंगाबाद महानगरपालिका आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये मराठवाडय़ात त्याचे पडसाद निश्चितच उमटू शकतात.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये उमेदवार कोण असावा, याचे निकष त्या प्रदेशातील सामाजिक, राजकीय परिस्थितीचे आकलन न करता निर्णय भारतीय जनता पक्षात झाला. त्याला पंकजा मुंडे यांची कोंडी करण्याची पार्श्वभूमी आहे. ऊसतोडणी मजुरांचे नेतृत्वही त्यांच्याकडे राहू नये असे प्रयत्न झाले. सुरेश धस यांनी ऊसतोडणी करारापूर्वी १८ जिल्ह्य़ांमध्ये केलेले दौरे आणि त्यास भाजपने दिलेली अधिकृत मान्यता यामुळे बऱ्याच गोष्टी बिनसलेल्या असल्याचे भाजप धुरीणांच्या लक्षात आले नाही. संपर्क असणाऱ्या आरक्षणाचा धुराळा उडत असताना दिलेला उमेदवार कोण असावा याचे आकलन चुकल्याने सतीश चव्हाण यांना ही निवडणूक अधिक सोपी गेल्याचे चित्र दिसून येत आहे. नव्याने नोंदणी झाल्यानंतर मतांचा टक्का वाढल्याने नवमतदारांनी पुन्हा ‘मोदी लाट’ निर्माण केली असल्याचे चित्र मतदानानंतर भाजप कार्यकर्त्यांनी निर्माण केले होते. मात्र, हा नवमतदार तसा प्रौढ आहे, हे लक्षात घेतले नाही. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात २० ते २९ वर्षे वयोगटातील ९२ हजार ७२७, तर २९ ते ३९ वर्षे वयोगटातील एक लाख ३७ हजार ८५७ मतदार होते. या मतदारांना बांधून ठेवणारा त्यांच्या संपर्कात असलेला शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक आणि शिक्षक वर्ग राष्ट्रवादीच्या बरोबर होता. जातीय ध्रुवीकरणाचा राष्ट्रवादीला फायदा झाला.

गेल्या पाच वर्षांत महापरीक्षा पोर्टल, डी.एड.च्या विद्याार्थ्यांचा कोंडवाडा, त्याच्या शिकवणीवर्गाचे अर्थकारण, या प्रश्नांचा ऊहापोह होऊन त्याची सोडवणूक भाजपच्या काळात  झाली नव्हती. ती खदखद जातीय ध्रुवीकरणात परिवर्तित करणे सतीश चव्हाण यांना सहज शक्य होते. त्यांना मिळालेली मते ही या कारणांचा परिपाक असल्याचेही सांगण्यात येते. भाजपच्या पराभवात केवळ धोरणात्मक चुका होत्या असे नाही, तर प्रचार यंत्रणा म्हणजे समाजमाध्यमे या गृहीतकांवरच पदवीधरांची निवडणूक लढविली गेली. भाजपने प्रभावीपणे प्रचार यंत्रणा राबविली. ही यंत्रणा अधिक प्रभावी व्हावी म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आघाडी सरकारवर आरोपांची लड लावून दिली. प्रत्यक्षात पदवीधरांच्या प्रश्नांची चर्चा जेवणात लोणचे एवढीच होती. तुलनेने महाविकास आघाडीतील प्रचारातील बोलघेवडेपणा जयसिंगराव गायकवाड यांनी पद्धतशीरपणे निभावला. ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत त्यांनी भाजपवर टीका केली. अन्य कोणी भाजपच्या आरोपाला प्रत्युत्तर देण्याच्या भानगडीत पडले नाही. पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवाराचा प्रचार म्हणजे सरकारवर टीका, असे चित्र दिसत असताना शैक्षणिक संस्थांमधून शिक्षक, प्राध्यापक मंडळी त्यांच्याकडे पीएच.डी. करणाऱ्या किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात होते. त्यांची नोंदणी करून घेण्यात आली होती. ज्याची नोंदणी अधिक तो विजय मिळवतो हे पदवीधर मतदारसंघाचे गणित. भाजपचे सहनोंदणीप्रमुख प्रवीण घुगे हेच उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नात होते. त्यांना डावलण्यात आल्याने राज्यस्तरीय नेत्यांना नाराजांनाही सांभाळावे लागले. परिणामी सतीश चव्हाण मोठय़ा फरकाने विजयी झाले. मतदानदरम्यान औरंगाबाद शहरात शिवसेनेनेही मतदार बाहेर काढण्यासाठी केलेले प्रयत्नही लक्षणीय होते. महाविकास आघाडीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये योग्य समन्वय बघायला मिळाला.

अंतिम आकडेवारी

*   सतीश चव्हाण (राष्ट्रवादी) – ११६६३८

*  शिरीष बोराळकर (भाजप)- ५८७४३

सतीश चव्हाण ५७,८९५ मतांनी विजयी