water apple or jaam for diabetic patients : उन्हाळा म्हटला की आंबे, कलिंगड यांपासून लिची व खरबूज अशा सर्व फळांचा आपण अगदी आवडीने आस्वाद घेत असतो. मात्र तुम्ही कधी कडक, पाणीदार व सुंदर लालचुटूक वा पांढरेशुभ्र ‘जाम’ हे फळ खाल्ले आहे का? हे फळ फक्त उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्याला आवर्जून पाहायला मिळते. लाल वा पांढरा रंगा आणि गोड चव असणाऱ्या या फळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम व क जीवनसत्त्व उपलब्ध असते. त्यामुळे या जाम फळाचे उन्हाळ्यात आवर्जून सेवन करावे, अशी माहिती द इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखातून आपल्याला मिळते.
या फळामध्ये पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याने तहान भागविण्याचाही तो उत्तम उपाय आहे. “या फळामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने कोरडेपणा टाळून शरीराचे हायड्रेशन टिकवून ठेवण्यास त्याचा फायदा होतो. त्यामुळे डिहायड्रेशन आणि थकवा यांसारखे त्रास टाळले जाऊ शकतात.
तसेच, हे फळ पोषक घटकांचे विघटन करून, त्यांना शरीरात शोषून घेण्याच्या प्रक्रियेस मदत करते. त्यामुळे आपली चयापचय क्रिया वाढते आणि पौष्टिक आहार घेणे व वजन नियंत्रण या बाबी प्रभावीपणे होतात,” असे जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूटच्या मुख्य आहारतज्ज्ञ सुषमा पी. एस. स्पष्ट करतात.
जाम या फळामध्ये ‘अँटीहायपरग्लायसेमिक’ [antihyperglycemic] नावाचा गुणधर्म असतो; जो रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त असतो. “जाममध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी प्रमाणात असतो; ज्यामुळे रक्तात साखर शोषून घेण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी रक्तातील ग्लुकोजची अचानक वाढ प्रतिबंधित होते. म्हणून मधुमेह असणाऱ्यांसाठी हे फळ फायदेशीर ठरते. त्यामुळे आहारतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार मधुमेही जाम या फळाचा आपल्या आहारात समावेश करू शकतात, असे सुषमा सांगतात.
इतकेच नाही, तर हे फळ रोगप्रतिकार शक्तीवररही सकारात्मक परिणाम करते. जाममध्ये क जीवनसत्त्वासह उपलब्ध असणाऱ्या इतर जीवनसत्त्वांच्या उत्तम प्रमाणामुळे शरीरात पांढऱ्या पेशींचीदेखील चांगल्या प्रकारे निर्मिती होते.
जाम कसे खावेत?
जाम या फळाचा सर्वसाधारणपणे लोणची, जेली किंवा सिरप बनविण्यासाठी वापर केला जातो. “या सुंदर फळावर थोडेसे मीठ टाकून ते कच्चेदेखील खाता येते.” जेव्हा ही फळे पूर्णतः पिकतात तेव्हा त्यांचा उपयोग हा ताजे खाण्यापासून ते सॅलडमध्ये वापरण्यापर्यंत केला जाऊ शकतो. “जाम हे चीज, काकडी, कोथिंबीर, इतर फळे [ट्रॉपिकल], चिली फ्लेक्स यांसारख्या पदार्थांबरोबरही अतिशय सुंदर लागतात,” असे सुषमा म्हणतात. द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या ‘जाम सॅलड’ची कृतीदेखील पाहू.
जाम सॅलड
साहित्य
२ जाम – बारीक चिरलेले
अर्धी काकडी – बारीक चिरलेली
एक गाजर – किसलेले / बारीक चिरलेले
हिरव्या पालेभाज्या – १ कप
डाळिंब दाणे – पाव कप
कुस्करलेले चीज – पाव कप
सुका मेवा
ताजे हर्ब्स
ऑलिव्ह तेल
अॅपल सायडर व्हिनेगर
मध
मीठ
मिरपूड
कृती
- एका बाऊलमध्ये ऑलिव्ह तेल, अॅपल सायडर व्हिनेगर, मध, मीठ व मिरपूड एकत्र करून त्याचे सॅलड ड्रेसिंग बनवून घ्या.
- दुसऱ्या बाऊलमध्ये जाम, काकडी, गाजर, डाळिंब दाणे, हिरव्या पालेभाज्या, चीज, सुका मेवा व ताजे हर्ब्स घालून सर्व पदार्थ एकत्र करून घ्या. त्यावर तयार केलेले सॅलड ड्रेसिंग घालून पुन्हा सर्व पदार्थ एकजीव करून घ्या.
- अशा प्रकारे तुमचे जाम सॅलड तयार आहे.