Maharashtra Politics Todays Top 5 News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोण कोणाबरोबर जाणार आणि कोण कोणाची साथ सोडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे पुण्यातील जमीन खरेदीचा मुद्द्यावरून विरोधकांकडून पार्थ पवारांवर कारवाईची मागणी केली जात आहे.
१) “हिंमत असेल तर समोर या, ओपन डिबेट करू”; रोहित पवारांचं गोरेंना खुलं आव्हान
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राज्यातील विविध जमीन घोटाळ्यांवरून राज्य सरकारवर टीका करत आहेत. यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते तथा मंत्री जयकुमार गोरे यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली होती आणि म्हटलं होतं की, झाकली मूठ सव्वा लाखाची, तुमचे जमीन घोटाळे निघाले तर कुठपर्यंत जातील, याचा विचार करावा. यानंतर रोहित पवार यांनी आज एक्सवर एक पोस्ट शेअर करत जयकुमार गोरे यांना आव्हान दिले आहे.
“जयकुमार गोरेजी आपण आधीच ‘उघडे’ पडले आहात, त्यामुळे उघड्या लोकांच्या तोंडून झाकली मूठ अशा गप्पा शोभत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने भिसे जमीन प्रकरणात तर उच्च न्यायालयाने शोषण प्रकरणात आपला जामीन फेटाळताना काय शेरे मारले होते ते पुन्हा एकदा सांगू का? असेल हिंमत तर या समोर, ओपन डिबेट करू…स्थळ वेळ सगळं तुम्ही ठरवा, आहे का हिंमत?”, असं रोहित पवारांनी जयकुमार गोरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
२) काँग्रेसची मोठी घोषणा, मुंबई महापालिका स्वबळावर लढवणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून यादमरम्यान आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. “आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मनसेबरोबर जाण्याचा आता तरी कोणताही विचार किंवा प्रस्ताव नाही, हे स्पष्ट आहे. मुंबई महापालिकेची तिजोरी खाली झाली आहे. मुंबईत भ्रष्ट्राचाराचे प्रकरणे खूप आहेत. खिरापत वाटली जात आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जे आवश्यक प्रश्न आहेत, ते प्रश्न घेऊन आम्ही निवडणुकीला समोरं जाऊ”, असं विजय वडेट्टीवार यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
३) “चोर तो चोरच, पार्थवर कारवाई झालीच पाहिजे”, वड्डेट्टीवारांची मागणी
पुण्यातील कोरेगाव जमीन प्रकरण जनतेसमोर आल्यानंतर तो व्यवहार रद्द करण्यात आला असला, तरी “चोरी झाली नाही असं होत नाही; चोर तो चोरच” अशा शब्दांत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर तीव्र टीका केली. नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले.
त्यांनी सांगितले की, पुणे येथील सरकारी जमीन खासगी व्यक्तींना देण्यात आली होती. अधिकाऱ्यांवर जबाबदारी टाकून सरकार सुटू शकत नाही. “जमीन परत केली म्हणजे गुन्हा रद्द झाला असे होत नाही. चोरी झालीच आहे, त्यामुळे पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
४) “निवडणूक आयुक्तांना ‘गड्डी’ मिळाली असेल,” बच्चू कडूंचा ‘ईव्हीएम’वरून गंभीर आरोप
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. पण, आमचा आंदोलनातच जास्त वेळ गेला. निवडणुकीची तयारी करण्यासाठी आम्हाला फार कमी वेळ मिळाला. ‘ईव्हीएम’चा घोळ नको व्हायला, सगळे ‘नामर्दाचे अवलाद’ आहेत. मशीन समोर करतात. मशीनमधून मतचोरी करतात. मी ज्याला मतदान केले, ते त्यालाच गेले की, दुसऱ्याला गेले, हे निवडणूक आयोग सांगू शकते का, असा सवाल बच्चू कडू यांनी अमरावती येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केला. निवडणूक आयुक्तांना ‘गड्डी’ मिळाली असेल, त्यामुळे हे सर्व सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.
५) एक दिवसासाठी मुख्यमंत्री झालात तर काय कराल?’ अमृता फडणवीस म्हणाल्या…
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या त्यांच्या पोस्टमुळे, तसंच त्यांच्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात. दरम्यान आता त्यांनी एका मुलाखतीत प्रश्नाला दिलेलं उत्तरही चर्चेत आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी तुम्हा एक दिवसासाठी मुख्यमंत्री केलं तर तुम्ही काय कराल असा प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला.
“देवेंद्र फडणवीस यांनी इतकं काम केलं आहे की एक दिवसासाठीही मला मुख्यमंत्रिपद मिळेल की नाही माहीत नाही. मुंबईतल्या पायाभूत सुविधा, महाराष्ट्रासाठी आणलेले विविध प्रकल्प, अधिकारी वर्गामधे होणारा भ्रष्टाचार संपवण्यासाठी त्यांनी त्या अधिकाऱ्यांवर वचक ठेवला आहे. तसंच अनेक प्रकल्प त्यांनी करायचं ठरवले आहेत मग तो नदीजोड प्रकल्प असेल किंवा इतर. पण तरीही एक दिवसासाठी मी जर मुख्यमंत्री झाले तर मी देवेंद्र फडणवीस आणि दिविजासह एखाद्या छान ठिकाणी जाऊन तो संपूर्ण दिवस घालवेन” असं उत्तर अमृता फडणवीस यांनी दिलं आहे.
