जुनाट वीजवाहिन्या, साधनसामग्रीचा अभाव आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भ्रष्ट व्यवहारामुळे शहराची वीज वितरणातील गळती कागदोपत्री फुगलेली दिसत असून त्याच्या आधारेच शहराला वाढत्या भारनियमनाच्या खाईत लोटले जात असल्याचा आरोप आ. मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. महावितरण कंपनीकडून आपल्याच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पापाचे खापर ग्राहकांच्या माथी मारण्याचा हा प्रकार थांबवून २० सप्टेंबपर्यंत वाढीव भारनियमन रद्द न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यंत्रमाग उद्योगाचे शहर असलेल्या मालेगावात वीजपुरवठा बंद असल्यावर अत्यंत विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे येथे कायमस्वरूपी वीजपुरवठा होणे अपरिहार्य असताना चुकीचे व अन्यायकारक निकष लावत मोठय़ा प्रमाणावर भारनियमन लादले जात आहे. त्यामुळे येथील यंत्रमाग व्यवसाय अडचणीत सापडला असल्याची तक्रार मुफ्ती यांनी केली. भारनियमन करताना वीजगळती व थकबाकी ही कारणे पुढे केली जात असली तरी ही दोन्ही कारणे सर्वाचीच दिशाभूल करणारी असल्याचा आरोप करत गळतीचे मुख्य कारण ३० वर्षांपूर्वीच्या असलेल्या जुन्या वीजवाहिन्या हे असून दुसरे कारण ग्राहकांना मागणी केल्याबरोबर वीजजोडणी न देणे हे असल्याचे त्यांनी नमूद केले. बहुसंख्य प्रामाणिक ग्राहकांना वेळेवर वीजपुरवठा हवा असतो. त्यासाठी वेळेवर देयके देण्याकडे त्यांचा कल असतो. उलट महावितरण कंपनीतील काही अधिकारी व कर्मचारी गैरव्यवहार करता यावा म्हणून वीजचोरीस संरक्षण देतात, असा आरोप त्यांनी केला. शहरात सद्यस्थितीत ३५ टक्क्यांपर्यंत गळती होत असल्याचे कागदोपत्री भासविले जात आहे.
 तथापि महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोखपणे काम केल्यास किमान २५ टक्के गळती कमी होईल, असा दावा मुफ्ती यांनी केला. शहरातील ११६ किलोमीटरच्या वीजवाहिन्या बदलण्याच्या कामास मंजुरी मिळाली असली तरी हे काम अत्यंत कूर्मपणे होत आहे. सायने येथील २२० केव्ही उपकेंद्राचे कामही असेच रेंगाळले आहे. या साऱ्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी खास बैठका घेण्याचे मंत्रालय पातळीवर दोनदा आदेश दिले गेले. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आजवर त्यात स्वारस्य दाखवले नसल्याची तक्रारही त्यांनी केली.