कोल्हापूर जिल्ह्याचा अर्थकारणाचा कणा म्हणून ओळखला जाणाऱ्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी तयारी केली असल्याची बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी दिसून आले. गोकुळ दूध संघामध्ये दोन गटांमध्ये सामना होणार हे उघड होत असताना जिल्हा बँकेत कशी लढाई होणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे आमदार महादेवराव महाडिक सतेज पाटील, खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार हसन मुश्रीफ, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी.एन.पाटील, माजी मंत्री विनय कोरे, माजी खासदार निवेदिता माने, माजी मंत्री प्रकाश आवाडे अशा अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यापकी काणता उमेदवार कोणाच्या आघाडीत असणार आणि कोण कोणाविरुद्ध लढणार हे मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी (२४ एप्रिल) ठरणार आहे. तर भाजप, शिवसेनेने अखेरच्या दिवशी या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला असून आमदार मिणचेकर यांच्यासह आठ जणांनी अर्ज दाखल केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ व जिल्हा मध्यवर्ती बँक या दोन्ही संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी हात आहेत. या संस्थांवर वर्चस्व मिळविण्यासाठी सर्व राजकीय पक्षातील प्रमुखांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ग्रामीण भागावर वर्चस्व ठेवण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक उपयुक्त ठरत असते. याचा विचार करून अनेकांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज सादर केले आहेत. या बँकेसाठी सेवा संस्था विभागातून १२, पणन शेती माल साखर, सूत विभागातून २, बँक, पतसंस्था विभागातून १, इतर शेती संस्था १, महिला २, अनुसुचित जाती, ओबीसी, भटक्या जाती प्रत्येकी १ असे संचालक निवडले जाणार आहेत. सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या तालुका पातळीवरील नेत्यांनी एकाच वेळी वेगवेगळ्या विभागातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. प्रत्येक निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत उमदेवारांची मोठी गर्दी उडाली आहे. बुधवारी अखेरच्या दिवशी अर्ज सादर करण्यासाठी जिल्हा बँकेच्या कार्यालयात प्रचंड गर्दी झाली होती. या परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
जिल्हा बँकेवर वर्चस्व मिळविण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षातील प्रमुखांचे प्रयत्न सुरूच आहेत. त्यांच्या प्रमुखांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. या जोडीलाच आता भाजप शिवसेनेचीही भर पडली आहेत. राज्यात सत्ता प्राप्त केल्यानंतर भाजप-सेनेला सहकारातील सत्तेचे डोहाळे लागले आहेत. सहकार तथा पलाकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, डॉ. सुजित मिणचेकर आदींची चर्चा होऊन आज अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यात सांगण्यात आले. शक्य असणाऱ्या सर्व विभागात अर्ज भरले जावेत अशा सूचना कार्यकर्त्यांना करण्यात आल्या. त्यातून आमदार मिणचेकर, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख महादेव गौड, इचलकरंजी नगरपालिकेतील शहरविकास आघाडीचे गटनेते जयवंत लायकर, माजी उपनगराध्यक्ष उदय बुगड, दिलीप मुथा आदींनी अर्ज सादर केले. गोकुळच्या निवडणुकीमध्ये आमदार महाडिक यांनी भाजपला स्वीकृत संचालकाची एक जागा देण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले होते. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही एखादी दुसरी जागा मिळविता येईल असे युतीचे धोरण दिसत आहे.
४१० जणांचे अर्ज दाखल
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षकि संचालक मंडळाच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या बुधवारी अखेरच्या दिवशी ४१० जणांचे ५३० अर्ज दाखल झाले. पहिल्या दिवशी ११० जणांचे १५५ अर्ज, दुसऱ्या दिवशी ११२ जणांचे १३५ अर्ज तर आज बुधवारी अखेरच्या दिवशी १७८ जणांचे २४१ अर्ज दाखल झाले. विक्रमी संख्येने अर्ज दाखल झाल्याने निवडणूक चुरशीची होणार अशी चर्चा सुरू आहे.