कोल्हापूरात शाहू मिलच्या जागेवरच छत्रपती शाहू महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल. या स्मारकासाठी लागेल तेवढी जमीन दिली जाईल. त्याबाबत मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत गटनेत्यांची बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी  नि:संदिग्ध ग्वाही वस्त्रोद्योग मंत्री नसीम खान यांनी सोमवारी विधानसभेत दिली.
शाहू मिलच्या जागेवर गारमेंट पार्क उभारण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या नियंत्रणाखाली निविदाही काढण्यात आली होती. मात्र ती निविदा रद्द झाली असून सध्या स्थानिक न्यायालयात काही दावे प्रलंबित आहेत. आहेत हे दावे निकाली काढून छत्रपती शाहूंच्या स्मारकाचा निणर्य घेतला जाईल, असे वस्त्रोद्योग मंत्र्यांनी सांगितले. मात्र शाहू मिलच्या जागेवर शाहू महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा आजच करा अशी मागणी करीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी अध्यक्षांसमोरील जागेत धाव घेऊन घोषणाबाजी सुरू केली. त्यात कोल्हापूरातील आमदार आघाडीवर होते. शाहू महाराजांनी राज्य आणि देशासाठी मोठे योगदान दिले आहे. शाहू मिलची जमीनही त्यांचीच आहे. त्यामुळे इंदू मिलमध्ये उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाप्रमाणेच शाहू महाराजांचे स्मारक उभारावे असा आग्रह करीत आमदारांनी घोषणा दिल्यामुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
पुन्हा कामकाज सुरू होताच सदस्यांनी आपला आग्रह कायम ठेवल्याने गोंधळ सुरूच होता. शेवटी या प्रश्नावर मुख्यमंत्र्याच्या स्तरावर गटनेते आणि मंत्र्यांची बैठक घेऊन उद्यापर्यंत निर्णय घेण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.