काही दिवसांपासून गाजत असलेल्या शहराजवळील पळसे येथील साई बाल अनाथाश्रमातील मुलांना भीक मागण्यास सांगणाऱ्या संचालकाविरुद्ध नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आश्रमातील आठ मुलींची सुटका करून त्यांना निरीक्षणगृहात ठेवण्यात आले आहे.
मागील आठवडय़ात सुरत येथील मंदिराजवळ पळसे आश्रमातील बालकांना भीक मागण्यास सांगितल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी स्वयंसिद्ध ग्रामीण विकास संस्था संचलित साई बाल अनाथाश्रमाचा संचालक अनिल बाविस्कर यास सुरत पोलिसांनी यापूर्वीच अटक केली.
 बाविस्करच्या अटकेमुळे हे प्रकरण अधिकच गाजू लागले. महिला व बालविकास विभाग परिविक्षा अधिकारी अनिल भोये यांनी शुक्रवारी सायंकाळी नाशिकरोड पोलीस ठाण्यात या आश्रमातील कारवायांविरोधात अर्ज दिला. भोये यांनी पोलिसांच्या मदतीने आश्रमातील नीलम मोरे, महेश बोराडे, साक्षी गायकवाड, मेघा सोनकांबळे, श्रुती सोनकांबळे या आठ मुला-मुलींना आश्रमातून बाहेर काढून निरीक्षणगृहात ठेवण्यात आले.
या प्रकरणी भोये यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आश्रमचालक बाविस्करविरूध्द आठ बालकांना भीक मागण्याच्या उद्देशाने अडवून ठेवले म्हणून बालन्यासतर्फे त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आश्रमावर छापा टाकून कामकाजाची माहिती घेतली. काही कागदपत्रेही पोलिसांनी जप्त केली आहेत.
दरम्यान, या प्रकरणास ज्या ठिकाणाहून सुरूवात झाली, त्या सुरत येथील पोलीसही नाशिकरोड येथे दाखल झाले असून चौकशीसाठी त्यांनी या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेतले आहे.