प्रदीर्घ शैक्षणिक परंपरा लाभलेल्या दापोली एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळावरील गैरव्यवहारांच्या गंभीर आरोपांची आज (२२ डिसेंबर) होणाऱ्या खास सभेत ‘जनसुनावणी’ होणार आहे. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे, पां. वा. काणे, सानेगुरुजी इत्यादी दिग्गजांनी शालेय शिक्षण घेतलेल्या या शैक्षणिक संस्थेला सव्वाशे वर्षांपेक्षा जास्त देदीप्यमान परंपरा अहे. पण गेल्या काही वर्षांत सोसायटीच्या संचालक मंडळाने मूलभूत शैक्षणिक सुविधांबाबत कमालीची बेपर्वाई दाखवल्यामुळे या शाळेला यंदाच्या वर्षी जिल्हा परिषदेच्या शिक्षण खात्याने ड दर्जा दिला आहे. या पाश्र्वभूमीवर माजी आमदार डॉ. चंद्रकांत मोकल, अतुल वैद्य, अनिश पटवर्धन, मुकुंद फाटक इत्यादींनी सोसायटीचे सभासद, पालक आणि हितचिंतकांना उद्या होणाऱ्या सभेला उपस्थित राहून या मुद्दय़ांवर जाब विचारण्याचे आवाहन केले आहे.
दापोली एज्युकेशन सोसायटी बचाव समितीतर्फे वाटण्यात आलेल्या आवाहन पत्रामध्ये विद्यमान संचालक मंडळाच्या गैरकारभाराचा पाढा वाचण्यात आला आहे. संस्थेच्या मालकीच्या जमिनीचे चुकीच्या पद्धतीने व्यवहार, भौतिक सुविधांचा अभाव, गटबाजी, पोषण आहार योजनेत गैरव्यवहार, निकृष्ट दर्जाचे बांधकाम इत्यादी आरोप या पत्रामध्ये केलेले आहेत. यासंदर्भात समितीकडे सर्व कागदोपत्री पुरावे असून त्या आधारे संचालक मंडळाला सभेत जाब विचारला जाईल, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या ३० डिसेंबर रोजी होणार असून, त्यामध्ये नवीन संचालक मंडळाची निवडणूक होणार आहे. त्यापूर्वीच मंडळाच्या मावळत्या सदस्यांच्या गैरकारभाराबाबत जनजागृती करण्याच्या हेतूने उद्या खास सभा बोलवण्यात आली असल्याचे संयोजकांनी नमूद केले.