माळशेज घाटात बुधवारी रात्री कोसळलेल्या कडय़ाखाली टाटा कंपनीचा ४०७ टेम्पो सापडल्याचे उघडकीस आले असून, त्यात चालक व मालक अशा दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह शुक्रवारी सायंकाळी मोठय़ा प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यास राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, पोलीस प्रशासन व महसूल विभागास यश मिळाले.
हा टेम्पो जुन्नर तालुक्यातील पिंपळवडी येथील आहे. भाजी   घेऊन बुधवारी मध्यरात्री माळशेज मार्गे कल्याणकडे जात असताना तो कडय़ाखाली सापडला. टेम्पो मालक रघुनाथ किसन वाघ (वय ५०, रा. पिंपळवंडी) व चालक नामदेव मेंगाळ (वय ३०, रा. मेंगाळवाडी) हे दोघे यात मृत्युमुखी पडले. दरम्यान, माळशेज घाटातील डोंगराचा कडा तुटून पडलेला महाकाय दगड फोडून बाजूला करण्यास पाऊस व बघ्यांची गर्दी यांचा अडथळा निर्माण होत असल्याने संपूर्ण दरड बाजूला करण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, असे राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ चे मुरबाड येथील कार्यकारी अभियंता एम. एन. पवार यांनी सांगितले.
कडा बाजूला करताना वाटाण्याची गोणी व वाहनाचा वायफर दिसून आल्याने या दगडाखाली वाहन असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यातच पिंपळवंडी येथील भाजीच्या गाडीचा संपर्क होत नसल्याने टेम्पोची दुर्घटना झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. दगड बाजूला करताना कुजलेली दरुगधी येत असल्याने पिंपळवंडी ग्रामस्थांना दगडाखाली वाघ यांचाच टेम्पो असल्याची खात्री झाली. दिवसभरानंतर प्रयत्न केल्यानंतर सायंकाळी दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. दगड बाजूला केल्यानंतरच आणखी काहीजण या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले आहेत का हे समजेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
पर्यटकांना न येण्याचे आवाहन
सिंगल रस्ता सुरू करण्यासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागेल, असे उपअभियंता दळवी यांनी सांगितले. माळशेज घाटातील परिस्थिती लक्षात घेऊन पर्यटकांनी शनिवार, रविवार घाटात वर्षांविहारासाठी येऊ नये. तसेच बघ्यांनी गर्दी कमी करावी व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जुन्नरचे तहसीलदार हिरामणी यांनी केले.