जातीबाहेरच्या मुलाशी लग्न केल्यामुळे चिडलेल्या वडिलांनी आपल्या १८ वर्षांच्या गर्भवती असलेल्या मुलीला जिवंत मारल्याची घटना शुक्रवारी नाशिकमध्ये घडली. या प्रकऱणी पोलिसांनी आरोपी एकनाथ किसन कुंभारकर (वय ३८) याला अटक केली. 
कुंभारकर एक रिक्षा घेऊन सकाळी आपली मुलगी पमा कांबळे हिच्या घरी पोचले. आजीची प्रकृती चिंताजनक आहे, असे सांगून त्यांनी आपल्या मुलीला रिक्षात सोबत घेतले. मुलगी त्यांच्यासोबत रिक्षातून जात असतानाच त्यांनी दोरीच्या साह्याने तिचा गळा आवळण्यास सुरुवात केली. रिक्षाचालकाने याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला विरोध करीत कुंभारकर रिक्षातून पळून गेला. रिक्षाचालकाने आणि आसपासच्या नागरिकांनी तातडीने कांबळे यांना शासकीय रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कांबळे यांच्या पोटात आठ महिन्यांचे अर्भक होते. पोलिसांनी गंगापूर रस्त्यावर कुंभारकर यांना अटक केली.