पर्यटकांना रत्नागिरी हापूस आंब्याची चव चाखता यावी, तसेच येथील पर्यटनस्थळांची, कला आणि सांस्कृतिक वैभवाची ओळख व्हावी, या उद्देशाने येत्या १ ते ३ मे या कालावधीत ‘रत्नागिरी जिल्हा आंबा महोत्सव’ आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी जाहीर केले.
रत्नागिरी हापूस आंब्याचा आस्वाद घेण्याचा योग्य कालावधी लक्षात घेऊन तसेच शाळांच्या आणि शासकीय सुटय़ांचा उपयोग करून अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करता येण्याच्या दृष्टीने आंबा महोत्सवाची तारीख निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहभागातून महोत्सवाच्या कार्यक्रम आराखडय़ाला अंतिम रूप देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध भागांतील आंब्याची स्वतंत्र चव आहे. चोखंदळ ग्राहकांना ही चव चाखता यावी, आंबे खरेदी करता यावेत, त्याचबरोबरीने इथल्या लोकसंस्कृती आणि खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेता यावा, या दृष्टीने आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील कलावंतांच्या सहभागातून चित्रकला स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा, पतंग स्पर्धा, नमन स्पर्धा, भजन स्पर्धा, जाखडी नृत्य स्पर्धा अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. लहान मुलांपासून अगदी आजी-आजोबांपर्यंत सर्वाना सहभागी होता येईल, या दृष्टीने संपूर्ण नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची मते आणि सूचना जाणून महोत्सवाच्या कार्यक्रमाला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. महोत्सवाच्या आयोजनासाठी सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत सर्व जिल्हावासीयांचा सहभाग अपेक्षित आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजय शिंदे, आमदार उदय सामंत आदींसह वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.