म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू थेन सेन २२ डिसेंबर रोजी येथील थिबा राजवाडय़ाला भेट देणार आहेत.
सुमारे शंभर वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या राजवाडय़ाला भेट देणारे ते पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यामुळे या भेटीबाबत कमालीची उत्सुकता आहे.
सर्वोच्च सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आलेले यू थेन सेन यांच्याबरोबर तीन लष्करी विमाने राहणार आहेत. त्याचप्रमाणे या दौऱ्याच्या कालावधीत विमानतळ ते थिबा राजवाडा हा मार्ग इतर सर्व प्रकारच्या वाहतुकीला बंद ठेवण्यात येणार आहे.
२२ डिसेंबर रोजी सकाळी येथे आगमन झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष प्रथम शिवाजीनगर परिसरातील पोस्टल कर्मचारी वसाहतीतील थिबा राजाच्या समाधीस्थळाची पाहणी करणार आहेत. या परिसराच्या सुशोभीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला असून या दौऱ्यात त्याबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतर ते थिबा राजवाडय़ाला भेट देऊन पाहणी करणार आहेत.
दरम्यान पुरातत्त्व खात्याचे साहाय्यक संचालक भालचंद्र कुलकर्णी यांनी या पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून या राजवाडय़ाच्या देखभाल व दुरुस्तीमध्ये जातीने लक्ष घातले आहे. पुरातत्त्व विषयातील ते जाणकार असल्यामुळे या कामाचा दर्जा उत्तम राहील, अशी अपेक्षा आहे. जिल्ह्य़ातील पुरातन मंदिरे आणि इतर बांधकामे संरक्षित स्मारक होण्यासाठीही कुलकर्णी यांनी विशेष रस घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी म्यानमारच्या विशेष दूतांनीही या राजवाडय़ाची पाहणी केली होती. त्यापाठोपाठ राष्ट्राध्यक्ष यू थेन सेन भेट देत असल्यामुळे या वास्तूचे उत्कृष्ट पद्धतीने पुनरुज्जीवन होण्याची शक्यता वाढली आहे. आर्ट सर्कल, रत्नागिरी या संस्थेने पाच वर्षांपूर्वी थिबा राजवाडय़ाच्या परिसरात संगीत कला महोत्सव आयोजित करण्यास सुरुवात केली तेव्हापासून या वास्तूकडे पुन्हा एकदा सर्वाचे लक्ष वेधले आहे.
ब्रिटिशांनी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस (१८८५) तत्कालीन ब्रह्मदेशाच्या थिबा राजाला पराभूत करून कैदी म्हणून भारतात आणले. सुरुवातीला काही महिने चेन्नई येथे ठेवल्यानंतर थिबाला रत्नागिरीत आणण्यात आले. पण त्याच्यासाठी राखून ठेवलेले निवासस्थान अपुरे पडू लागल्यामुळे हा राजवाडा बांधण्याचा निर्णय तत्कालीन ब्रिटिश सरकारने घेतला. भाटय़ाच्या खाडीचे विलोभनीय दर्शन येथून होते. १९१०मध्ये राजवाडा बांधून पूर्ण झाल्यानंतर थिबा राजा येथे राहण्यास आला. पण त्यानंतर जेमतेम सहा वर्षांनी १९१६मध्ये त्याने याच वास्तूत अखेरचा श्वास घेतला.