मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला आता वर्क फ्रॉम होमची सुविधा देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागानं शासन आदेश काढून यासंदर्भातील माहिती दिली आहे. लॉकडाउनच्या कालावधीत राज्य शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती नियंत्रित करण्यात येत आहे. तसंच भविष्यातीलही परिस्थिती लक्षात घेऊन शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरात राहून कार्यालयीन आवश्यकतेनुसार आणि तातडीनुसार शासकीय कामाचा निपटारा करण्यासाठी उपाययोजना करणं आवश्यक असल्याचंही यात म्हटलं आहे.

शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरात राहून कार्यालयीन आवश्यकतेनुसार आणि तातडीनुसार शासकीय कामाचा निपटारा करण्यासाठी उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं शासन आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे. करोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीनं उपस्थितीवर नियंत्रण आणण्यात आलं आहे. दरम्यान, उर्वरित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी घरातूनच शासकीय काम करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. तसंच त्यासाठी व्हॉट्सअॅप, ई-मेलचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली असून यामाध्यमातून कामं पूर्ण झाल्याची माहिती एसएमएसद्वारे संबंधितांना देण्यात यावी, असंही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. तसंच प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याला त्यांचा शासकीय ई-मेल अथवा वापरात असलेला ई-मेल आणि व्हॉट्सअॅप क्रमांकाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यासही सांगण्यात आलं आहे. तसंच याचा वापर करून जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.



एखादा प्रस्ताव ई-मेलवर फॉरवर्ड केल्यानंतर त्याची माहिती संबधित अधिकाऱ्यांना एसएमएसद्वारे किंवा व्हॉट्सअॅपद्वारे द्यावी. तसेच सदरचा प्रस्ताव पाठविताना संबंधित अधिकाऱ्यांना ई-मेलच्या सीसीमध्ये ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसंच पुढील आदेशापर्यंत हे आदेश लागू राहणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.