विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासंदर्भात मोठी संधी उपलब्ध करून देणारा येथील मेट भुजबळ नॉलेज सिटीचा ‘मेट उत्सव २०१३’ सोमवारी ‘काइट फ्लाइंग’ या कार्यक्रमाने सुरू होत असून या वर्षी पर्यावरण संरक्षणावरील ‘पंचतत्त्व’ या प्रमुख संकल्पनेवर उत्सवातील कार्यक्रम गुंफले आहेत.
आरोग्य आणि आहार, शिल्पकला, वाळू कला, जल रक्षण या विषयांवरील कार्यशाळा, तर संगीत या गटात रॉक बँड, डीजे इव्हिनिंग असे कार्यक्रम होतील. अभियंता विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘टेक्नोफेस्ट’ हा कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात आला आहे. एअर शो, फॅशन शो, शास्त्रीय गायन, समूह नृत्य, वाद्यवृंद अशा विविध कार्यक्रमांनी मेट उत्सव नटलेला आहे. याशिवाय ‘श्यामचे वडील’ या चित्रपटाचा शो तसेच चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक, लेखक आणि संगीत दिग्दर्शक यांच्याशी मेट बीकेसीचे विद्यार्थी व कर्मचारी वर्ग प्रत्यक्ष हितगुज करू शकणार आहेत. संस्थेचे विश्वस्त समीर भुजबळ व मेट बीकेसीच्या संचालिका शेफाली भुजबळ उत्सव यशस्वितेसाठी मार्गदर्शन करत आहेत.