आंध्र प्रदेशातल्या हैदराबाद येथे झालेल्या बॉम्बस्फोटानंतर आज राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) व दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) वरिष्ठ अधिकारी सकाळी नांदेडात दाखल झाले. नांदेडमधल्या तीन तरुणांची दोन्ही यंत्रणांनी स्वतंत्र चौकशी केली. मात्र, ही चौकशी पुणे व दिल्ली बॉम्बस्फोटाशी संबंधित होती, असे खात्रीलायक वृत्त आहे.
दिल्ली पोलिसांनी दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात अटक केलेला मोहम्मद मकबुल हा मूळचा नांदेडचा आहे. पुणे बॉम्बस्फोट प्रकरणात पोलिसांनी मोहमद अहमद, तहसीन अख्तर, असदुल्लाह अख्तर, व वकास या चौघांना फरार घोषित केले आहे. आरोपी मकबुलला दिल्ली पोलिसांनी अटक केली. त्याच्या साथीदारांकडून या चौघांची माहिती मिळते का, या संदर्भात आज तीन तरुणांची दिवसभर चौकशी करण्यात आली. एनआयएचे पोलीस अधीक्षक डॉ. सुहास वारके व एटीएसचे पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही चौकशी केली. दिल्ली पोलिसांनी अटक केलेला स. मकबुल हा कुख्यात अतिरेकी रियाज भटकळ याच्या संपर्कात होता.
स. मकबुल याचा पुणे बॉम्बस्फोटात संबंध नसला, तरी दिल्ली व अन्य अतिरेकी कारवायात त्याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. स. मकबूल याने हैदराबादच्या दिलसुखनगर व अन्य भागांची टेहळणी केली होती.
त्यामुळे या स्फोटात त्याचे काही साथीदार सहभागी आहेत का, या संदर्भातही चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. चौकशी केल्याच्या वृत्ताला स्थानिक अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला; पण या संदर्भातील अधिक माहिती देण्यास नकार दिला.