म्हैसाळ योजनेच्या रब्बी हंगामासाठी मागणी नसताना म्हैसाळ योजनेचे पाणी सोडल्याने आलेल्या २ कोटी १५ लाखाच्या वीजबिलासाठी कृष्णाखोरे महामंडळाच्या ठेवीतून तरतूद करुन पून्हा एकदा योजना सुरू करण्याचे मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत.  लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांची कोणतीही लेखी मागणी नसताना म्हैसाळ योजना सुरू करण्याचा जलसंपदा विभागाचा अट्टाहास या निमित्ताने पुढे आला आहे.
गेल्यावर्षी म्हैसाळ योजनेतून सोडण्यात आलेल्या पाण्याचे वीजबिल ६ कोटी ९६ लाख ९८ हजार थकीत होते. राजकीय कार्यकर्त्यांनी मागणी केल्यानंतर या वीजबिलासाठी टंचाई निधीतून तरतूद करण्यात आली.  त्यानंतरच रब्बी हंगामातील पहिल्या अवर्तनासाठी दि. ३ ते २८ जानेवारी या दरम्यान पाणी सोडण्यात आले.  लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून या पाण्यासाठी मागणी उपलब्ध झाली नाही.  त्यामुळे या कालावधीत वापरण्यात आलेल्या विजेचे बिल कोणी भरायचे हा यक्ष प्रश्न होता. २ कोटी १५ लाख रुपयांचे बिल महावितरणने कृष्णाखोरे महामंडळाला धाडले होते.  बिलासाठी योजनेचा वीज पुरवठाही खंडित करण्यात आला होता.
 मात्र या वीजबिलासाठी कृष्णा खोरे महामंडळाने आपल्या ठेवीतून २ कोटी १५ लाखाची तरतूद करीत विजेचे बिल अदा केले आहे.  योजनेचा वीज पुरवठा उद्या म्हणजे मंगळवार पर्यंत पूर्ववत सुरू केला जाणार असून त्यानंतर म्हैसाळ योजनेच्या कालव्यातून प्रत्यक्ष पाणी योजना सुरू होणार आहे.  उन्हाळी हंगामासाठी पहिले संचित आवर्तन १७ मार्चपासून सुरू होत असल्याचे निवेदन मंडळाने प्रसिद्ध केले असून पाणी पट्टीवसुलीसाठी १२ शाखाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.