वनमंत्र्यांशी चर्चा करणार -भुजबळ
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात अतिविशिष्ट व श्रीमंतांसोबतच सर्वसामान्य पर्यटकांना मिनीबस आणि विद्यार्थ्यांना सवलत देण्यात यावी तसेच जंगल सफारीसाठी नियमित गाडय़ांची संख्या ६५ करावी यासाठी वनमंत्र्यांशी मुंबईत एका विशेष बैठकीत चर्चा करणार आहे. यासोबतच पर्यटन संकुलासाठी चार कोटी व रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती पर्यटन व सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
छगन भुजबळ यांनी सोमवारी सकाळी ताडोबा प्रकल्पाचा दौरा केल्यानंतर मोहुर्लीत बांधकाम, वन व पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी ‘लोकसत्ता’ने लावून धरलेल्या विद्यार्थ्यांना ताडोबा प्रवेशात सवलत देण्याच्या तसेच सर्वसामान्य पर्यटकांना मिनीबस सुरू करण्याच्या सूचनेचे स्वागत केले. तसेच या दोन्ही मुद्यांवर आजच मुंबईत वनमंत्री पतंगराव कदम यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगून पर्यटन विकास व बांधकाम खात्याच्या विविध योजनांची त्यांनी माहिती दिली. ताडोबात येणाऱ्या पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत असल्याने त्यांना अद्यावत सुविधा पुरवण्यासाठी पर्यटन महामंडळाने वनविकास महामंडळाच्या सहकार्याने अनेक नवीन प्रकल्प हाती घेतले असून विदर्भ निसर्ग पर्यटन मेगा सर्किट कार्यक्रमांतर्गत ४ कोटी ७ लाख खर्चून १८ नवीन कक्षाचे पर्यटक निवास बांधकाम हाती घेण्यात आले आहे. सोबतच ताडोबा परिसरात ९० लाख खर्चून तंबू निवास, नेचर ट्रेल उभारण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या मेगा ट्रेड सर्किट कार्यक्रमांतर्गत विदर्भ निसर्ग पर्यटनासाठी ४५ कोटींचा निधी उपलब्ध करण्यात येत असून ही कामे वन विकास महामंडळ व पर्यटन विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहेत. या योजनेंतर्गत ताडोबा प्रकल्पात पर्यटन विकासात वाढ करण्यात येणार आहे. आता ताडोबात १२ वातानुकूलित व तीन साधे कक्ष असून त्यात वाढ करण्यात येणार आहे. यानंतर ताडोबात ३० वातानुकूलित कक्ष व तीन साधे कक्ष पर्यटनासाठी उपलब्ध होणार आहेत. चंद्रपूर ते ताडोबा रस्त्याचे दुरुस्तीकरण अतिशय आवश्यक असून या रस्त्यापैकी ९ किलोमीटर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून रस्ता दुरुस्तीसाठी १ कोटी २० लाख तर नूतनीकरणासाठी ४ लाख ५० हजाराचा निधी आवश्यक आहे. यासंदर्भात संबंधित खात्याचे मंत्री व सचिव यांच्याशी चर्चा करणार आहे. जंगल सफारीसाठी मोहुर्ली येथे २७, कोलारा ९ व खुटवंडा ४ अशा ४० वाहनांना जंगल सफारीसाठी परवानगी असून ही संख्या ६५ पर्यंत वाढविण्यात यावी यासाठी वनमंत्र्यांशी आजच चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
स्थानिकांना रोजगार मिळावा तसेच पर्यटकांना स्वस्त दरात चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी ब्रेकफास्ट ही योजना सुरू करण्याचा पर्यटन विभागाचा विचार आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प जागतिक नकाशावर असल्याने जंगल सफरी तसेच राहण्याच्या सुविधा यासाठी पर्यटकांना अडचण होऊ नये म्हणून ताडोबाचे बुकिंग ऑनलाइन व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती दिली.
चंद्रपूर जिल्हा बृहत पर्यटन विकास आराखडय़ासाठी जिल्हाधिकाऱ्यांना ५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मार्च २०१३ अखेर बृहत आराखडा पूर्ण होणार आहे. भद्रावती शहरातील पर्यटन विकासाचा आराखडा तयार होणार आहे. तसेच गवराळाला धर्मशाळा बांधकामासाठी १ कोटी ५० लाख देण्यात येणार आहेत. चिमूरमध्ये प्रादेशिक पर्यटन योजनेतून १ कोटी २० लाख मंजूर केले आहेत. ब्रह्मपुरीला पर्यटन कला व सांस्कृतिक महोत्सवासाठी ५ लाखांचा निधी पर्यटन विभागाने मंजूर केला आहे. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, एमटीडीसीचे मुख्य अभियंता शैलेंद्र बोरसे, वरिष्ठ व्यवस्थापक हनुमंत हेडे, मुख्य अभियंता सगणे, अधीक्षक अभियंता लुंगे, कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 12th Feb 2013 रोजी प्रकाशित
ताडोबात सामान्य पर्यटकांसाठी मिनीबस, विद्यार्थ्यांना सवलत
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात अतिविशिष्ट व श्रीमंतांसोबतच सर्वसामान्य पर्यटकांना मिनीबस आणि विद्यार्थ्यांना सवलत देण्यात यावी तसेच जंगल सफारीसाठी नियमित गाडय़ांची संख्या ६५ करावी यासाठी वनमंत्र्यांशी मुंबईत एका विशेष बैठकीत चर्चा करणार आहे. यासोबतच पर्यटन संकुलासाठी चार कोटी व रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती पर्यटन व सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
First published on: 12-02-2013 at 04:36 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minibus for common tourist in tadoba concession for students