scorecardresearch

शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्र घोटाळा ; सांगली जिल्हा परिषदेत सत्तार यांच्या मुलीचे प्रमाणपत्र?

राज्यभर गाजत असणाऱ्या  शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार  प्रकरणातील तीन प्रमाणपत्रे  सांगली जिल्हा परिषदेकडे होती

शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्र घोटाळा ; सांगली जिल्हा परिषदेत सत्तार यांच्या मुलीचे प्रमाणपत्र?
सांगली जिल्हा परिषदेत आढळलेले शिक्षक पात्रता परीक्षेचे प्रमाणपत्र.

सांगली : राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलीच्या नावाचे कथित प्रमाणपत्र सांगली जिल्हा परिषदेत आढळून आले आहे. हे प्रमाणपत्र सांगलीत कसे आले, ते खरे की खोटे याचा शोध पोलीस घेत आहेत.

राज्यभर गाजत असणाऱ्या  शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार  प्रकरणातील तीन प्रमाणपत्रे  सांगली जिल्हा परिषदेकडे होती. त्यातील २ प्रमाणपत्रे ही संबंधित व्यक्तीने ताब्यात घेतली असून तिसरे प्रमाणपत्र हे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची मुलगी हीना फरहीन अब्दुल सत्तार शेख यांच्या नावाचे असल्याचे दिसून येत आहे. या प्रमाणपत्रावर कोणीही अद्याप हक्क सांगितला नसल्याने ते सांगली शिक्षण विभागाच्या ताब्यात आहे. 

हे प्रमाणपत्र  १९ जानेवरी २०२० रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचे  आहे. मात्र हे प्रमाणपत्र सांगलीत कसे आले, याचा शोध मात्र अद्यापही लागलेला नसून पोलीस याबाबतीत अधिक तपास करत आहेत असे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी सांगितले. हे प्रमाणपत्र सांगली जिल्हा परिषदेत कसे आले, हे प्रमाणपत्र खरे की खोटे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

या प्रकरणी कृषी मंत्री सत्तार यांचा राजीनामा घ्यावा असे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी दिले आहे. शिक्षक पात्रता  परीक्षेचा घोटाळा समोर आल्यानंतर प्रमाणपत्राची  पडताळणी करण्यासाठी तालुका पातळीवर मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेतून  ११७ जणांचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी शासनाकडे पाठिवण्यात आले. घोटाळा उघडकीस आल्यानंतर शासनाने  ७  हजार  ८७४  उमेदवार अपात्र ठरविले. त्यांच्यावर कारवाईचे  आदेश देण्यात आले असले तरी अद्याप  ५७४  उमेदवार विविध शाळामध्ये कार्यरत असल्याचा आरोप फराटे यांनी केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Minister abdul sattar s daughter s tet certificate lying in sangli zp zws

ताज्या बातम्या