जिल्ह्य़ाचे पालकमंत्री भास्कर जाधव यांच्या कन्या व चिरंजीवांच्या शाही विवाहांवर केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जोरदार टीका केल्यामुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून जाधव यांच्या राजकीय भवितव्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
जाधव यांचे चिरंजीव समीर आणि कन्या कांचन यांच्या विवाहांचा सोहळा १३ फेब्रुवारी रोजी चिपळूण येथे मोठय़ा थाटात पार पडला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह राज्याच्या सुमारे निम्म्या मंत्रिमंडळासह विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी या समारंभाला हजेरी लावली. त्यासाठी भव्य शामियाना आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या हजेरीमुळे पोलीस फाटा आणि शासकीय अधिकारी-कर्मचारीही मोठय़ा संख्येने राबत होते. जिल्ह्य़ात एवढय़ा भव्य प्रमाणावरील विवाह सोहळा प्रथमच झाल्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा होती. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांनी जोरदार टीका केल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात मोठी खळबळ उडाली असून जाधव यांच्या राजकीय भवितव्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
शेजारच्या गोव्यात असलेले पवार या विवाह सोहळ्याला हजर राहिले नाहीत, तेव्हाच काही जणांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. पण त्याचा एवढा स्फोट होईल, अशी कल्पना नव्हती. जाधव यांचा सार्वजनिक क्षेत्रातील गोतावळा आणि एकाच वेळी दोन विवाहांमुळे झालेली गर्दी नियंत्रणाबाहेर गेली होती. तसेच मंत्रिगणांची हेलिकॉप्टर्स आणि गाडय़ांचे ताफे हा चिपळुणात एकच चर्चेचा विषय झाला होता. या विवाहांचे स्वरूप घरगुती व खासगी ठेवले असते तर टीकाकारांना संधी मिळाली नसती, असे आता जाधव समर्थकही खासगीत बोलू लागले आहेत. पण सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या सर्वपक्षीय मंडळींनी याच पद्धतीने सोहळे साजरे करणे आता जणू सर्वमान्य बाब झाली आहे. अशा परिस्थितीत पवारांनी टाकलेला बॉम्बगोळा सामाजिक दृष्टिकोनातून नसून राजकीय स्वरूपाचा आहे, असाही अनेकांचा होरा आहे. कारण सुमारे तीन वर्षांपूर्वी जाधव यांचे राजकीय प्रतिस्पर्धी सुनील तटकरे यांच्या चिरंजीवांचा विवाह अशाच प्रकारे धुमधडाक्यात साजरा झाला होता, पण तेव्हा कोणी टीका केली नव्हती. त्यामुळे विवाह सोहळ्यातील उधळपट्टीच्या निमित्ताने जाधवांचा काटा काढण्याचा त्यांच्या हितशत्रूंचा डाव असल्याचा संशय व्यक्त होत आहे.