अलिबाग ते पेणदरम्यान प्रवासी रेल्वेमार्गाला अखेर रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. खासदार अनंत गिते यांच्या मागणीनंतर रेल्वे अर्थसंकल्पात याबाबत विशेष तरतूद करण्यात आली आहे. मध्य रेल्वे आणि एमएमआरडीएच्या संयुक्त भागीदारीतून प्रकल्पाला लवकरच सुरुवात होऊ शकेल, अशी माहिती अनंत गिते यांनी दिली आहे.
अलिबाग ते पेण या मार्गावर प्रवासी रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी भेट दिली होती. त्या वेळी धरमतर ते अलिबागदरम्यान रेल्वे लाइन टाकण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला होता. सध्या अस्तित्वात असणाऱ्या रस्त्याला लागूनच ही रेल्वे लाइन टाकण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून, कार्लेखिंड इथे बोगदा प्रस्तावित करण्यात आला आहे. या रेल्वे मार्गासाठी जवळपास २३८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असणार आहे.
अलिबाग शहराचा एमएमआरडीए झोनमध्ये समावेष असल्याने या मार्गासाठी मध्य रेल्वे आणि एमएमआरडीए यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प उभारला जाणार आहे. यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पातील चर्चेदरम्यान अनंत गिते यांनी या रेल्वे लाइनची आग्रही मागणी केली होती. अखेर याच रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वे मार्गाला मंजुरी देत असल्याचे रेल्वे मंत्रालयाने जाहीर केले आहे. तसेच अर्थसंकल्पात रेल्वे मार्गासाठी तरतूदही करण्यात आली आहे. आता राज्य सरकारने प्रकल्पासाठी लागणारे भूसंपादन करून द्यायचे आहे. भूसंपादन झाले की, रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळू शकणार आहे, असेही खासदार गिते यांनी स्पष्ट केले.