किराणा घराण्याची गायकी ही भारतीय अभिजात संगीतात मानाचे स्थान मिळवून राहिली. हा, संगीतभूमी म्हणून जगभर ख्यातकीर्त असणाऱ्या मिरजेच्या मातीचा गुणधर्म असल्याचे संगीताचे अभ्यासक आणि ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम यांनी सांगितले. हीरक महोत्सवी अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवामध्ये राम कदम पुरस्कार सिने अभिनेते सुबोध भावे यांना  संगोराम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी बोलताना संगोराम म्हणाले की, हरियाणामधील कैराना गावाच्या नावापासून संगीतरत्न अब्दुल करीम खाँसाहेब यांनी ही गायकी विकसित केली. संगीतकार राम कदम हे या गायकीचे आपण पाईक असल्याचा अभिमान बाळगत होते. त्यांच्या नावाचा पुरस्कार बालगंधर्वाची भूमिका सिनेमातून अजरामर करणारे कलावंत सुबोध भावे यांना देण्यात आला हा योगायोग असल्याचे सांगत, भावे यांचा या पुरस्कारावर अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.
बालगंधर्वानी मिळालेल्या स्री भूमिकेचे आपल्या अभिनयाने सोने केल्याचे सांगत संगोराम म्हणाले की, राम कदम यांनी आपल्या संगीतातून लावण्यांना कलात्मकतेचा दर्जा मिळवून दिला. मिरजेतील वाद्य निर्मितीची परंपरा जगात विख्यात आहे. ती जोपासण्याची जबाबदारी सध्याच्या पिढीवर आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना भावे म्हणाले की, बालगंधर्वाची भूमिका करीत असताना संगीतातील बारकावे शिकता आले हे माझे भाग्य असून यापुढील काळात लोकमान्यांच्या जीवनावरील चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मी भेटणार आहे. बालगंधर्वाची भूमिका करीत असताना खऱ्या अर्थाने स्त्रीत्व सादर करणे किती कठीण आहे याची जाणीव झाली. त्यांच्या भूमिकेबद्दल राम कदम पुरस्कार मिळणे म्हणजे माझ्या कलेला मिळालेली दाद असल्याचे मी समजतो.
या वेळी संगीत महोत्सवाचे अध्यक्ष मधू पाटील मळणगावकर, उपाध्यक्ष शेखर करमरकर,  गायक व अभिनेते मंगेश बोरगावकर, विजय कदम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन बाळासाहेब मिरजकर, मोहसीन मिरजकर आदींनी केले. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर विजय कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मराठी भावगीतांचा कार्यक्रम सादर केला.