येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर अभियंता सतीश चिखलीकर यांच्या अटकेनंतर अचानक अंतर्धान पावलेली त्यांची पत्नी मंगळवारी आश्चर्यकारकपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागासमोर हजर झाली. त्यांची प्राथमिक चौकशी करण्यात आली असून चिखलीकर यांच्या मालमत्तेच्या कागदपत्रांमध्ये जे नातेवाईक वा खासगी व्यक्तींचा संबंध आहे, त्या सर्वाना नोटीस बजावण्यात आल्याचे या विभागाने म्हटले आहे.
सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता चिखलीकर आणि शाखा अभियंता जगदीश वाघ यांना ठेकेदाराकडून लाच घेताना पकडल्यानंतर त्यांच्याकडील कोटय़वधींची माया समोर आली आहे. संशयितांना पोलीस कोठडी मिळाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या अवैध मालमत्तेच्या छाननीचे काम हाती घेतले. या घडामोडी सुरू असताना चिखलीकर यांची पत्नी स्वाती या अचानक गायब झाल्या. चौकशीसाठी त्यांना तीन वेळा नोटीस बजावण्यात आली; परंतु त्या हजर झाल्या नाहीत. यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात असताना मंगळवारी त्या अचानक या विभागाच्या कार्यालयात हजर झाल्या. चौकशी पथकाने स्वाती चिखलीकर यांची प्राथमिक चौकशी केल्याची माहिती या विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी दिली. चिखलीकर यांनी ज्या ज्या ठिकाणी बदली झाली, त्या सर्व ठिकाणांसह नवी मुंबई व पुणे येथेही मालमत्तेत गुंतवणूक केल्याचे तपासात पुढे आले आहे. ही मालमत्ता नातेवाईक व काही खासगी व्यक्तींच्या नावे खरेदी करण्यात आली. या प्रकरणाशी संबंधित अशा सर्व घटकांना नोटिसा बजावण्यात आल्याचे महावरकर यांनी सांगितले.