मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा लागेल, या साठीच मंत्रिमंडळाची शेवटची बठक अचानक रद्द करुन समाजाच्या हाता-तोंडाशी आलेला घास काढण्यात आला, असा आरोप करुन राष्ट्रवादीत प्रवेश करतानाच आपण समाजासाठी काम करणार असल्याचे स्पष्ट केले होते. असे असताना पक्षाने नोटीस पाठवली, याचे दुख वाटते. पण समाजासाठी काम करणे हा गुन्हा असेल तर तो आयुष्यभर करू, असे स्पष्ट करीत येत्या बुधवारी (दि. १२) राज्यस्तरीय बठक आपली पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार विनायक मेटे यांनी येथे पत्रकार बैठकीत सांगितले.
पूर्वी इशारा दिल्याप्रमाणे काँग्रेस आघाडीबाबत १२ मार्चला मुंबईत शिवसंग्राम पदाधिकाऱ्यांची बठक घेऊन आपण निर्णय जाहीर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्याला वेळोवेळी विरोध केल्याचा आरोपही मेटे यांनी केला. पुण्यात समता परिषदेने काढलेला मोर्चा व नाशिकमध्ये राणे समितीसमोर आरक्षणाविरोधात दिलेली ८९ निवेदने भुजबळ यांच्या बंगल्यावरच तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सुहास पाटील आदी उपस्थित होते.