सातारा पोलिसांनी २००८ मध्ये राज ठाकरेंवर दाखल केलेल्या चार वेगवेगळ्या खटल्यांमध्ये त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.
रत्नागिरी येथे त्यांना २००८ साली अटक झालेली असताना सातारा येथे किरकोळ हिंसक प्रकार घडले होते. या वेळी सातारा पोलिसांनी शांततेचा भंग करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, सार्वजनिक ठिकाणी जमाव जमविणे आदी बाबीखाली सतरा-अठरा जणांवर गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणी राज ठाकरेंसह सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या गुन्ह्य़ामध्ये राज ठाकरे सातारा न्यायालयात हजर झाले नव्हते म्हणून त्यांना वॉरंट काढण्यात आले होते. त्याची गुरुवारी सातारा येथील जिल्हा न्यायालयात चार वेगवेगळ्या न्यायाधीशांसमोर सुनावणी झाली. या चारही गुन्ह्य़ांपैकी एक गुन्ह्य़ात १५ हजार, तर इतर तीन गुन्ह्य़ांत साडेसात हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.
या कामासाठी सकाळी ११ च्या दरम्यान राज ठाकरे सातारा सर्कीट हाऊसवर दाखल झाले. त्यानंतर लगेचच सव्वाअकरा वाजता ते न्यायालयात आले. या वेळी न्यायालय परिसरात सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे येथून मोठय़ा संख्येने आलेल्या कार्यकर्त्यांनी खचाखच गर्दी होती. मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यायालय परिसरात व बाहेर असणाऱ्या जमावाने घोषणाबाजी सुरू केली तेव्हा पोलिसांनी त्यांना शांततेचे आवाहन केले. कार्यकर्ते घोषणाबाजी थांबवत नसल्याने पोलिसांनी जमाव पांगविला. साडेबाराच्या सुमारास न्यायालयातून बाहेर पडून राज ठाकरे लगेचच पुण्यात रवाना झाले.