मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जानेवारी महिन्यात पार पडलेल्या अधिवेशनात शॅडो कॅबिनेटची स्थापना करणार असल्याचं जाहीर केलं होतं. पक्षाचा १४ वा वर्धापन दिन आज पार पडणार असून यावेळी राज ठाकरे शॅडो कॅबिनेटमधील आपल्या नेत्यांची नावं जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विष्णुदास भावे नाटयगृहात मनसेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान यावेळी राज ठाकरे अजून काय घोषणा करणार आहेत याकडेही सर्वाचं लक्ष लागलं आहे.

शॅडो कॅबिनेटमध्ये कोणाला संधी ?
सुत्रांच्या माहितीनुसार, मनसेकडून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर, अभिजीत पानसे, शालिनी ठाकरे यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. महाअधिवेशनात नेतेपदी निवड करण्यात आलेल्या अमित ठाकरे यांच्यावर मात्र कोणतीही जबाबदारी दिली जाणार नाही असं समजत आहे.

बाळा नांदगावकर : गृह
नितीन सरदेसाई : अर्थ
अविनाश अभ्यंकर : महसूल
संजय चित्रे : वन
शिरीष सावंत : ऊर्जा
संदीप देशपांडे : नगरविकास आणि पर्यटन
अमेय खोपकर : सांस्कृतिक
अभिजित पानसे : शालेय शिक्षण
योगेश परुळेकर : सार्वजनिक बांधकाम
संजय शिरोडकर : एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम उपक्रम
शालिनी ठाकरे : महिला आणि बालकल्याण
रिटा गुप्ता : आरोग्य

काय आहे शॅडो कॅबिनेट ?
सरकारमध्ये विरोधी पक्षाला मोठं महत्त्व असतं. विरोधी पक्षाद्वारे सरकारमधील प्रत्येक नेत्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येते. विरोधी पक्षाच्या कॅबिनेटला शॅडो कॅबिनेट असं म्हटलं जातं. या कॅबिनेटमध्ये प्रथम श्रेणीचे १५ ते २० मंत्री असतात. राज्यमंत्री, उपमंत्री यांचा कॅबिनेटमध्ये समावेश नसतो. दरम्यान, राज्यातील मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या पाहता मनसेच्या शॅडो कॅबिनेटमधील प्रत्येकावर अधिक जबाबदारी असेल.

यापूर्वीही भारतात शॅडो कॅबिनेटचे प्रयोग करण्यात आले होते. २००५ मध्ये तत्कालीन सरकारला लक्ष्य करण्यासाठी शिवसेना आणि भाजपानं शॅडो कॅबिनेटची स्थापना केली होती. तर मध्य प्रदेशमध्येही काँग्रेसने तत्कालिन मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना लक्ष्य करण्यासाठी शॅडो कॅबिनेटची स्थापना केली होती. गोव्यातही शॅडो कॅबिनेटचा प्रयोग करण्यात आला होता.