भाजपाने वेळोवेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची फसवणूक केल्याची टीका मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या वेबसंवादात रविवारी केली. युतीच्या काळात हिंदूत्वाच्या आडून भाजपाने बाळासाहेबांची फसवणूक केल्याचा दावा करताना बाळासाहेब भोळे होते, पण मी नाही. हिंदूत्वाच्या नावाखाली भाजपाच्या डावपेचांकडे काणाडोळा करणार नाही, असा थेट इशाराच उद्धव ठाकरेंनी दिलाय. भाजपाने गेल्या काही काळात राज्यात विकृत आणि खालच्या पातळीचे राजकारण केल्याने ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा’ असा जाब जनताच भाजपा नेत्यांना विचारेल, असा हल्लाही ठाकरे यांनी भाजपावर चढवला. दरम्यान ‘बाळासाहेब भोळे होते’ या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर मनसेने पहिली प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेसाठी हिंदूत्व हा श्वास असल्याने उठता-बसता त्याचा डंका वाजवण्याची आम्हाला गरज नाही. हिंदूत्वाच्या आधारे देशात पहिली निवडणूक शिवसेनेने लढवली आणि जिंकली ती म्हणजे विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणूक. विशेष म्हणजे शिवसेना हिंदूत्वाच्या आधारे ही निवडणूक लढवत असताना भाजपाने त्यास विरोध करून उमेदवार उभा केला होता. पण शिवसेनेने ही निवडणूक जिंकल्यानंतर भाजपाचे नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे हिंदूत्वाच्या आधारे युती करण्यासाठी आले, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली. तसेच हिंदूत्वाच्या नावाखाली भाजपाचे नेते बाळासाहेबांची फसवणूक करत होते हे मी पाहिले आहे. बाळासाहेबांनी हिंदूत्वासाठी भाजपाच्या खेळीकडे काणाडोळा केला. बाळासाहेब भोळे होते, पण मी भोळा नाही. हिंदूत्वाच्या नावाखाली भाजपाच्या कृत्यांकडे काणाडोळा करणार नाही, असे ठाकरे यांनी सुनावले. महाराष्ट्रातील हिंदू आता या लोकांच्या हिंदूत्वाला फसण्याएवढे भोळे नाहीत, असेही ठाकरे यांनी ठणकावले.

राज यांची उडवली खिल्ली
हिंदूत्वाचे नाव घेत नवे खेळाडू आले असले तरी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. कधी मराठीचा तर कधी हिंदूत्वाचा मुद्दा घेत खेळ सुरू असतो. डोंबाऱ्यांचा अपमान करणार नाही. गेली दोन वर्षे नाटक-करमणूक बंद होते. आता फुकट करमणूक होत असेल तर का नाही पाहायची. यांचे झेंडेही बदलले. हिंदूत्व उपयोगाला आले तर आले नाही तर सोडून देऊ, अशी ही मंडळी आहेत. असे भोंगेधारी-पुंगीधारी खूप बघितले आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची खिल्ली उडवली. 

मनसेचा टोला
उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब भोळे असल्याचा संदर्भ दिल्याने मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी याच मुद्द्यावरुन टोला लगावलाय. “खरंच, बाळासाहेब भोळे होते त्याचाच फायदा घेऊन तुम्ही कार्याध्यक्ष झालात नाहीतर आयुष्यभर फोटोच काढत बसले असता,” असं ट्विट देशपांडे यांनी केलंय.

दरम्यान, या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी, केवळ मलाच सारे हवे यासाठी हे सर्व सुरू असल्याचा टोलाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला.