महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभाग आणि उच्च न्यायालयाच्या संमतीने, अलिबाग येथील सत्र न्यायालयात स्वतंत्र मोक्का न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. यापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा १९९९ अंतर्गत दाखल होणारे सर्व खटले सुनावणीसाठी ठाण्याच्या सत्र न्यायालयात पाठवले जात होते.  मोक्का अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत रायगड जिल्ह्य़ात दाखल होणाऱ्या खटल्यासाठी आता अलिबागच्या सत्र न्यायालयात स्वतंत्र न्यायालयाची स्थापना करण्यात आली असून हे खटले चालवण्यासाठी डॉ. वाय. जी. चावरे आणि एच. ए. पाटील यांची विशेष सत्र न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर सरकारी पक्षातर्फे हे खटले चालवण्यासाठी जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. प्रसाद पाटील यांची विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिर दरोडा प्रकरण खटला हा जिल्ह्य़ातील मोक्काअंतर्गत चालवण्यात येणारा पहिला खटला असणार आहे.