पाकव्याप्त काश्मीरमध्ये लक्ष्यभेद केल्याने भारताने आपली शक्ती दाखवल्याचे सकारात्मक परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर दिसून येत आहेत. जे देश पूर्वी भारताला शांत राहण्याचा सल्ला देत होते, आता तेच देश भारतासोबत आहेत, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केले. ‘सर्जिकल स्ट्राईक’वर प्रथमच संघाने आपली भूमिका मांडली आहे.

भागवत यांनी रविवारी नवरात्रीनिमित्त मनीषनगर भागातील देवीच्या मंदिराला भेट दिली. तेथे नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जगात कोणतीही गोष्ट ताकद दाखविल्याशिवाय होत नाही. आतापर्यंत भारताने आपली शक्ती दाखविली नाही. जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय सीमेवर तणावाची स्थिती निर्माण होत होती तेव्हा तेव्हा अमेरिका भारताला शांत राहण्याचा सल्ला देत होती, पण आता शांततेचा सल्ला देणारेच देश भारताच्या पाठीशी उभे राहताना दिसत आहेत.

 

संदेश पारकर यांचा भाजपत प्रवेश

सावंतवाडी : कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष व काँग्रेसचे संदेश पारकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपात प्रवेश केला. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात भाजप पक्षबांधणी करण्यासाठी यापुढे प्रयत्न करण्याची ग्वाही पारकर यांनी दिली. काँग्रेस, राष्ट्रवादी व पुन्हा काँग्रेस असा प्रवास करीत संदेश पारकर भाजपात दाखल झाले. भाजपात प्रवेश झाल्यावर सिंधुदुर्गात दाखल झालेले संदेश पारकर म्हणाले, जिल्ह्य़ात भाजपा पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्यावर टीका करणाऱ्यांनी माझी काळजी करू नये. जिल्ह्य़ातील नगर परिषदा, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेशी युती करून निवडणुका लढविण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे ते म्हणाले.