लावण्यांसाठी अनुकूल

हवामान तज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा काहीसा उशाीरा आलेला मान्सूनचा पाऊस आता मात्र कोकणच्या तिन्ही जिल्ह्यांमध्ये स्थिरावला असून काही ठिकाणी भातलावणीच्या  कामांनाही सुरवात झाली आहे.

यंदा देशभरात उत्तम पाऊस होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला असून कोकणसह दक्षिण किनारपट्टीच्या भागात शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. या पाश्र्वभूमीवर चालू महिन्याचे सुमारे तीन आठवडे अतिशय तुरळक स्वरूपाचा पाऊस पडल्यामुळे वेधशाळेचा अंदाज नेहमीप्रमाणे चुकण्याची भिती व्यक्त केली जात होती. मात्र गेल्या आठवड्य़ापासून वातावरणात लक्षणीय बदल झाला असून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये मान्सूनच्या जोरदार सरी बरसू लागल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात गेले सलग चार दिवस दमदार पाऊस होत असून नदी-नाले भरून वाहू लागले आहेत. आज सकाळी संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात एकूण सरासरी ५०.३३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्याच्या ९ तालुक्यांपैकी रत्नागिरी (८७ मिमी), लांजा (६४), गुहागर (६३) आणि  संगमेश्वर (६२) या चार तालुक्यांमध्ये पावसाचा विशेष जोर राहिला. तसेच रायगड जिल्ह्यात सरासरी ५४.११ मिलीमीटर, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवशीही (२४ व २५ जून) रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येकी सरासरी ९० मिलीमीटर पाऊस पडला. त्यापैकी २४ जून रोजी दिवसभरात दापोली (१७३ मिमी), मंडणगड (१५६) आणि गुहागर (१४४) या तीन तालुक्यांमध्ये तर सुतारे दीडशे मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. त्याचप्रमाणे खेड (८४), रत्नागिरी (७९) आणि चिपळूण या तालुक्यांमध्येही चांगला पाऊस पडला. गेल्या २५ जून रोजी गुहागर तालुक्यात सर्वात जास्त पाऊस (१७० मिमी) पडला. तसेच रत्नागिरी (१३९), दापोली (१३०), मंडणगड (१०३), खेड (९७) आणि चिपळूण या तालुक्यांमध्येही पावसाचा जोर चांगला राहिला.

सर्वदूर होत असलेल्या या दमदार पावसामुळे भाताच्या रोपांची जोमदार वाढ होत असून काही ठिकाणी तर शेतकऱ्यांनी लावणीच्या कामांनाही प्रारंभ केला आहे. पुढील आणखी किमान चार दिवस पावसाचा जोर असाच कायम राहील, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू

दरम्यान रत्नागिरी शहरालगत कारवांची वाडी येथे वहाळात पोहण्यासाठी उतरलेल्या सुनील संत्ताप्पा गुरगुंटे (वय १३ वष्रे, रवींद्रनगर, कुवारबाव),   या शाळकरी मुलाचा अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढय़ाबरोबर वाहत गेल्याने बुडून मृत्यू ओढवला.