जगभरात आज ‘मदर्स डे’ चा फिव्हर आहे. भारतामध्येही प्रत्येकजण आईविषयी प्रेम व्यक्त करताना दिसतोय. मातृत्व हे प्रत्येक महिलेसाठी आनंदी क्षण असतो, पण एक अशी ही महिला आहे, की तिला मातृत्व नकोय. ही अवस्था आहे कुंटणखान्याच्या दलदलीत अडकलेल्या रेखाची. (नाव बदललेले आणि प्रातिनिधिक आहे) मातृत्व दिनाच्या निमित्ताने उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात असणाऱ्या कुंटणखान्यातील महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी रेखा म्हणाली की, लहानपणीच माय बापाच डोक्यावरचं छत उडून गेले. वयात येताच मी कुंटणखान्यात पोहोचले. यावेळी प्रत्येक स्त्रीप्रमाणे तिच्यातही मातृत्वाची भावना असल्याचे दिसले. पण नंतर ‘साहब क्या करेंगे बच्चे पैदा करके? या प्रश्नाने ती भावना मारुन टाकल्याचे तिने सांगितले. ती म्हणते, मी या देहव्यापारात असल्यामुळे माझ्यासोबत लग्न कोण करणार? माय-बाप नाही, लग्न नाही मग मातृत्वाचं सुख कसं मिळणार, असे प्रश्न उपस्थित करत रेखा मातृत्वाविषयी व्यक्त झाली. रेखा म्हणते, मी आजही आई होऊ शकते, पण होणाऱ्या अपत्याला नाव कोणाचं देणार? माझ्या आयुष्याच्या बिकट अवस्थेत मी त्याचं संगोपन कसं करणार?
कुंटणखान्यात फसल्यामुळे मातृत्वाला मुकलेल्या रेखाची व्यथा सुन्न करणारीच आहे. पण तिच्याशिवाय मातृत्वामुळे कुंटणखान्यात पोहोचलेल्या महिलांची कहाणी हेलावून सोडणारी आहे. लेकरांच्या उदरनिर्वाहासाठी देह व्यापार करणाऱ्या लतानेही (नाव बदलले आहे) तिची व्यथा मांडली. २० वर्षापूर्वी अग्नीच्या साक्षीने विवाहबंधनात अडकलेली लता मुलीच्या प्रेमासाठी आज कुंटणखान्यात अडकली आहे. घरच्यांना मुलगा हवा असताना तीन मुलींचा जन्म झाला. तीन मुलींना जन्म दिल्यानंतर मुलगा होत नाही म्हणून तिचा नवरा घर सोडून गेला. तीन मुलींच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असताना तिच्या लहान मुलीच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे तिला रुग्णालयत दाखल करावं लागलं. मुलीच्या उपचारासाठी डॉक्टरांनी दिवसाला १० हजार रुपये खर्च सांगितला. तिच्यावर उपचार करता यावेत म्हणून लताचे पाय कुंटणखान्याकडे वळले. ती आपल्या लहान मुलीवरील उपचारासाठी आजही या दलदलीत आहे. तिच्या इतर दोन मुलींपैकी मोठी मुलगी ११वीत आहे. तर दुसरी ७ वीचे शिक्षण घेत आहे.
याच कुंटणखान्यातील प्रौढ असलेल्या आणि भाभी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिलेची व्यथाही सुन्न करणारी अशीच होती. मुलीचं शिक्षण आणि लग्न करण्यासाठी भाभी देहव्यापाऱ्याच्या दलदलीत आली. तिनं आता मुलीच लग्न केले. एवढच नाही तर मुलाला पोलीस बनवले. पण देहव्यापारात सडल्याच्या भावनेने ती आपल्या मुलांसोबत अंतर ठेऊन वागते. शेवटी काय तर मातृत्वची आस असणारी आणि मातृत्व उपभोगून प्रेमापोटी कुंटणखान्यात पोहोचलेल्या या दलदलीतून तिची मुक्तता होऊन तिला मातृत्वदिनाच्या शुभेच्छा मिळाल्या तर तो या महिलांसाठी खऱ्या अर्थाने आनंदाचा दिवस असेल.