“…..म्हणून एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देतो”- खासदार राहुल शेवाळे

करोना संकटामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडला असल्याच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी या नात्यानं खारीचा वाटा उचलत आहे

राहुल शेवाळे
खासदार राहुल शेवाळे यांनी एक लाखांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला. (सौजन्यः राहुल शेवाळे ट्विटर)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील करोना लसीकरण मोहिमेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला खासदार राहुल शेवाळे यांनी आपलं खासदारकीचं एक महिन्याचं वेतन दिलं आहे. महाराष्ट्रातील मोफत करोना लसीकरण मोहिमेसाठी खारीचा वाटा देण्यासाठीच्या भावनेतून हे करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन खासदार राहुल शेवाळे यांनी एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई आणि खासदार विनायक राऊत उपस्थित होते. राहुल शेवाळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबद्दलची माहिती दिली आहे.


देशभरात १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचं मोफत करोना लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं जाहीर केला. या निर्णयानुसार केंद्राकडून महाराष्ट्राला करोना प्रतिबंधक लसींचा साठा उपलब्ध होत आहे. मात्र काही प्रमाणात राज्य सरकारला करोना लस खरेदी करणं अनिवार्य आहे. केंद्र सरकारकडून कोरोना लसींचा साठा मोफत उपलब्ध होत असला तरीही राज्यातल्या जनतेचं मोफत लसीकरण वेगानं करण्याचं मोठं आव्हान राज्य सरकारसमोर आहे.

यासाठी यंत्रणेवर मोठा खर्च करावा लागेल. तसेच राज्य सरकारला काही प्रमाणात लस खरेदी करणं अनिवार्य आहे. आधीच गेल्या वर्षभरापासून करोना संकटामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडलेला आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी या नात्यानं खारीचा वाटा उचलावा, या भावनेनं माझं वेतन ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’त जमा करण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया खासदार राहुल शेवाळे यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mp rahul shewale donated his salary of one month to chief minister fund vsk