ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे अलीकडेच तुरुंगातून सुटून आले आहेत. पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. पत्राचाळ घोटाळ्यात त्यांना जवळपास १०० दिवस त्यांना तुरुंगात राहावं लागलं. या संपूर्ण घटनाक्रमानंतर संजय राऊत यांनी नाशिक येथील सभेत तुरुंगातील अनुभव सांगितला. आपण तुरुंगात अतोनात त्रास सहन केला, असं विधानही संजय राऊतांनी यावेळी केलं.

खरं तर, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मालेगावात २६ मार्च रोजी जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी मालेगाव दौरा केला. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केलं. दरम्यान, त्यांनी आपले तुरुंगातील अनुभव सांगितले आहेत.

हेही वाचा- “ती ऑडिओ रेकॉर्डिंग मी स्वत: केली”, जितेंद्र आव्हाडांच्या मुलीला जीवे मारण्याच्या कटाबद्दल मोठा खुलासा

यावेळी संजय राऊत म्हणाले, “गेली चार-पाच दिवस माझी प्रकृती खरोखर बरी नाही. पण आज येथे यायचं ठरलं होतं. म्हणून मी टाळलं नाही. कारण मला आज मालेगावात यायचंच होतं. जेव्हा मी एखाद्याला गाडायचं ठरवतो, त्याला गाडतोच. आज त्याची सुरुवात झाली आहे. परवा मला दिल्लीत एका मुलाखतीत प्रश्न विचारला, हे गद्दार शिवसेना भवनावर चाल करून येणार आहेत. मी म्हटलं येऊ द्या… त्यांना २० फूट जमिनीच्या आतमध्ये गाडल्याशिवाय राहणार नाही. २० फूट जमिनीच्या खाली गाडू… ही धमकी आहे का? असं विचारल्यावर मी म्हटलं… होय, धमकी आहे असं समजा. ही नुसती धमकी नाही. तर ही धमकी कृतीमध्ये उतरवण्याची क्षमता आमच्यात आहे.”

हेही वाचा- “शिवसेना भवनावर चाल करून येणाऱ्या गद्दारांना…”, ही धमकी समजा म्हणत संजय राऊतांचं मोठं विधान!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुरुंगातील त्रासाबद्दल संजय राऊत म्हणाले, “लोक म्हणतात की, संजय राऊत खूप टोकाचं बोलणारा माणूस आहे. होय, मी टोकाचं बोलणारा माणूस आहे. कारण मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. मी तुरुंगात जाऊन आलोय. मी माझ्या पक्षासाठी तुरुंगात जाऊन आलो. मी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी तुरुंगात जाऊन आलो. या ५० गद्दारांप्रमाणे मी गुडघे टेकले असते, तर मीही तुरुंगात जाण्यापासून वाचलो असतो. मी तुरुंगात अतोनात त्रास सहन केला. तरीही मी शिवसेना सोडली नाही. सोडणारही नाही. कारण असंख्य शिवसैनिक समोर बसले आहेत. ती खरी शिवसेना आहे. त्याच्यासाठी मला आणि आपल्याला लढायचं आहे.”